एपीएल रेशनकार्डे रद्दची सूचना नाही!
अन्न-नागरी पुरवठा खात्याचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने कोणतेही एपीएल कार्ड रद्द करण्याची सूचना दिलेली नाही तसेच कोणतेही एपीएल कार्ड रद्द केलेले नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. काही प्रसारमाध्यमांवर ई-केवायसी नोंदणी न झालेली एपीएल कार्डे रद्द करण्यात येत असल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. त्यात तथ्य नाही. 2 सप्टेंबर रोजी राज्यात 25,13,798 एपीएल रेशनकार्डे होती. 16 नोव्हेंबरपर्यंत हा आकडा 25,62,566 एपीएल कार्डे आहेत. अपात्र कुटुंबांची बीपीएल कार्डे रद्द करण्याचे काम हाती घेतल्याने काही बीपीएल कार्डांचे एपीएल कार्डात रुपांतर होत आहे. त्यामुळे एपीएल कार्डांची संख्या 48,768 इतकी वाढली आहे. राज्यात 22 लाख बीपीएल कार्डे रद्द करण्यात आल्याचे वृत्तही खोटे आहे, असे स्पष्टीकरणही अन्न-नागरी पुरवठा खात्याने पत्रकाद्वारे दिले आहे.
अपात्र कुटुंबांच्या कार्डाचे एपीएलमध्ये रुपांतर
वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा अधिक असणाऱ्या 12 लाख रेशनकार्डांचा शोध खात्याने घेतला आहे. कार्डधारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता बीपीएल कार्डे रद्द केली जात आहेत. त्यामुळे कार्डधारकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक बीपीएल कार्डधारकांना रेशनकार्डाचे एपीएलमध्ये रुपांतर झाल्याचे समजलेले नाही. अचानक कारवाई झाल्यामुळे ते गोंधळात आहेत.