महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एपीके फाईल’ : गुन्हेगारांच्या ताब्यात ग्राहकांचा मोबाईल!

11:26 AM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका बँकेच्या नावाने आलेल्या एपीके फाईल्सच्या माध्यमातून फसवणूक : फाईलवर क्लिक करताच लुबाडणूक : ओटीपी क्रमांकाचीही गरज नाही, खबरदारी हाच उपाय

Advertisement

बेळगाव : सायबर गुन्हेगारांचे कारनामे सुरूच आहेत. प्रत्येक वेळा त्यांची गुन्ह्याची पद्धत बदलत असते. बेळगाव परिसरात तर सध्या डिजिटल अरेस्टनंतर मेघा गॅसच्या नावाने फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. आता ‘एपीके फाईल’ पाठवून ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम क्षणार्धात हडप करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फसवणुकीच्या या प्रकारात ओटीपी किंवा इतर कसल्याच माहितीची गरज भासत नाही.

Advertisement

गेल्या पंधरवड्यात बेळगाव परिसरातील दोघा जणांची एपीके फाईल्सच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. एकाला दहा लाखांचा तर आणखी एकाला चार लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. एका बँकेच्या नावाने आलेल्या एपीके फाईल्सच्या माध्यमातून ही फसवणूक झाली असून सायबर क्राईम विभागात या दोन्ही प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश, सायबर क्राईम विभागाचे एसीपी जे. रघु आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जागृतीचे काम हाती घेतले आहे.

पोलीस आयुक्त कार्यालयातूनही समाजमाध्यमातून यासंबंधी जागृती करण्यात येत आहे. केवळ बेळगावच नव्हे तर उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाड, गदग, बागलकोट, विजापूरसह अनेक शहरात असे प्रकार घडू लागले आहेत. काही ठिकाणी ‘पीएम किसान न्यू लिस्ट’ नावाची एपीके फाईल पाठवून शेतकऱ्यांचीही फसवणूक केली जात आहे. एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर किंवा वैयक्तिक नंबरवर अशी फाईल पाठविली जाते. कुतूहलाने जर त्याच्यावर क्लिक केले तर थेट तुमच्या मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जातो. लगेच ते तुमच्या बँक खात्यातील रक्कम कोणत्याही ओटीपीशिवाय हडप करतात.

पीएम किसान योजनेतील लाभार्थींची यादी, वेगवेगळ्या बँकांच्या नावाने मालवेअर तयार करून फोन ग्राहकांना पाठवण्यात येते. एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर मोबाईलचा ताबाच त्यांच्याकडे जातो. एपीके फाईलवर क्लिक करताना किंवा अधिकृत वेबसाईट वगळता व्हॉट्सअॅपवरून पाठविण्यात आलेल्या मालवेअरच्या माध्यमातून एखादे अॅप डाऊनलोड करायचा प्रयत्न केलात तर फसवणूक ही ठरलेलीच. कर्नाटकातील विविध भागात वाहन परिवहन एपीके फाईलच्या माध्यमातूनही फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. मंगळूरमध्ये तर एका बँक ग्राहकाच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम हडप करण्यात आली आहे. यासाठी सायबर गुन्हेगारांकडून एकापाठोपाठ एक असे सातत्याने मेसेज पाठविले जातात. मेसेज वाचून त्यांच्याशी संपर्क साधल्यास ते सावजाला ठकवतात. मेसेजच्या माध्यमातून जर सावज फसले नाही तर शेवटी एपीके फाईल्स पाठवतात.

परिवहन अॅपच्या माध्यमातून वाहने व वाहनमालकाविषयी माहिती घेऊन त्यांना एपीके फाईल पाठवण्यात येते व त्यांची फसवणूक केली जाते. केवळ बेळगाव शहरच नव्हे तर जिल्ह्यातील विविध भागातही असे प्रकार घडले आहेत. व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या एपीके फाईल्सवर ‘एपीके’ असा उल्लेख असतो. फाईलऐवजी जर त्याचे लिंक पाठवल्यास तसा उल्लेखही नसतो. त्यामुळे ग्राहक सहजपणे फसतात. कुतूहलाने या फाईलमध्ये काय आहे? कसली माहिती आहे? हे पाहण्यासाठी फाईलवर क्लिक केल्यास त्यांच्या बँक खात्यातील रक्कम काही क्षणात हडप केल्या जातात.

‘अँड्रॉईड पॅकेज किट’ (एपीके फाईल) हे अत्यंत प्रभावी असतात. मोबाईलमधील गॅलरी, कॅमेऱ्यांचे अॅक्सेस घेण्यासाठी परवानगी घेत नाहीत. थेट ते त्याच्यावर ताबा मिळवतात. त्यामुळेच अशा फाईल्सवर क्लिक केल्यास फसवणूक करण्यास सायबर गुन्हेगारांना शक्य होते. यापूर्वी बँक खात्यातील रक्कम हडप करण्यासाठी ओटीपीची गरज भासत होती. आता एपीके फाईल्समुळे सायबर गुन्हेगारांना कसल्याही प्रकारच्या ओटीपीची गरज भासत नाही. सहजपणे मोबाईल ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम हे हडप करू शकतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेणे उपयुक्त ठरते.

अधिकृत प्लेस्टोअरवरूनच डाऊनलोड करा

कोणीही आपल्या मोबाईलवर येणाऱ्या एपीके फाईल्सवर क्लिक करू नये. जर एखादे अॅप डाऊनलोड करायचे असेल, अधिकृत प्लेस्टोअरच्या माध्यमातूनच डाऊनलोड करावे, असे आवाहन सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी केले आहे. जर आपल्या मोबाईलवर एपीके फाईल्स आली तरी त्यावर क्लिक करू नये. क्लिक केले तर फसवणूक ठरलेलीच, असेही त्यांचे म्हणणे आहे.

-पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article