एपीके फाईल...बँक बॅलन्स जाईल!
प्रत्येकाने अनधिकृत वेबसाईटपासून दूर राहणेच योग्य : पोलिसांकडून सातत्याने जागृती
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात सायबर क्राईमचे प्रकार वाढले आहेत. गेल्या महिन्यात डिजिटल अरेस्टच्या घटना वाढल्या होत्या. आता एपीके फाईलच्या माध्यमातून सावजांना ठकविण्यात येत आहे. पोलिसांनी सातत्याने जागृती करूनही फशी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. बेळगाव शहराबरोबरच जिल्ह्यातील काही बँक खातेधारकांचीही एपीके फाईलच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. अँड्रॉईड अॅप्लिकेशन पॅकेजची फाईल व्हॉट्सअप पाठविली जाते. अशा फाईलींवर बारीक अक्षरात एपीके असा उल्लेख असतो. काही तरी महत्त्वाचा मजकूर असणार, या समजुतीने त्यावर क्लिक केले की संबंधितांची फसवणूक होणार, हे निश्चित. सायबर गुन्हेगार एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईल ग्राहकांच्या बँक खात्यात शिरतात. खात्यात रक्कम किती आहे? याचा तपशील त्यांना मिळतो. केवळ बँक खातेच नव्हे तर ग्राहकांच्या मोबाईलमध्ये असलेली इतर माहितीही सायबर गुन्हेगारांच्या हाती लागते. त्यामुळे व्हॉट्सअपवर येणाऱ्या एपीके फाईलींवर कोणीही क्लिक करू नये, असे आवाहन सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने केले जात आहे.
नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन
स्वत: पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनीही वेळोवेळी सायबर गुन्हेगारी थोपविण्यासाठी समाजमाध्यमातून जागृतीचे उपक्रम राबविले आहेत. खासकरून गुंतवणुकीच्या नावे होणारी फसवणूक टाळण्यासाठी आपल्याशी संबंधित नसलेल्या व्यक्तींकडून येणारी माहिती किंवा अनधिकृत वेबसाईटवर कोणी विश्वास ठेवू नये. मुळात डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन दोन दिवसांपूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांनी केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याची गरज आहे.