एपीजे सुरेंद्र हॉटेल्सचा आयपीओ 5 रोजी होणार खुला
समभाग सुचीबद्ध 12 फेब्रुवारी रोजी होणार : किमान 14,880 रुपये इतकी गुंतवणूक करावी लागणार
वृत्तसंस्था/ मुंबई
एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडचा (एपीजे) आयपीओ पुढील आठवड्यात येत असून यात 7 फेब्रुवारीपर्यंत बोली लावण्याची संधी असणार आहे. या आयपीओची साधारण किंमत ही 147 ते 155 रुपये प्रति समभाग राहणार आहे. कंपनी या इश्यूद्वारे 920 कोटी रुपये उभारणार आहे.
यापैकी कंपनी 600 कोटी किमतीचे नवीन शेअर्स जारी करेल आणि 320 कोटी रुपये किमतीचे उर्वरित शेअर्स कंपनीच्या प्रवर्तकांकडून विकले जातील.
कंपनी आयपीओद्वारे उभारलेल्या पैशाचा वापर तिच्या जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि कॉर्पोरेट हेतूंसाठी करेल. कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 12 फेब्रुवारी रोजी सूचीबद्ध केले जातील.
तुम्ही किमान 14,880 ची गुंतवणूक करू शकता. या आयपीओसाठी, किरकोळ गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी अर्ज करावा लागेल म्हणजे 96 शेअर्स. तुम्ही आयपीओच्या वरच्या प्राइस बँडवर 155 रुपयावर 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला 14,880 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकतात. 1,248 शेअर्स, ज्यासाठी त्यांना 193,440 गुंतवावे लागतील.