अपेक्स इकोटेकचा आयपीओ आज होणार खुला
मुंबई :
वॉटर ट्रिटमेंटशी संबंधित सेवा देणारी कंपनी अपेक्स इकोटेकचा आयपीओ बुधवार 27 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 25.54 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते.
आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 27 तारखेला खुला होणार असून गुंतवणुकदारांना याकरिता 29 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. 25.54 कोटी रुपये आयपीओतून उभारले जाणार असून 34.99 लाख नवे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत. अनुज डोसाज, रामकृष्णन बालासुंदरम अय्यर, अजय रैना आणि ललिता मोहन दत्ता हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओकरिता कंपनीने 71-73 रुपये प्रति समभाग अशी समभागाची किंमत निश्चित केली आहे. रिटेल गुंतवणुकदारांना आयपीओकरिता कमीतकमी 1 लाख 16 हजार 800 रुपये गुंतवावे लागणार आहेत. पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी 50 टक्के, रिटेल गुंतवणुकदारांसाठी 35 टक्के आणि इतर बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी आयपीओतील हिस्सा 15 टक्के राखीव ठेवण्यात आला आहे.
काय करते कंपनी
आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 53 कोटी रुपयांचा महसूल आणि करपश्चात नफा 6.63 कोटी रुपये कमावला होता. पाण्याचा पुनर्वापर करण्यासंबंधी सेवा पुरविणारी ही कंपनी आहे. 2009 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती.