अपरा व परामाया आणि इसापनीती
अध्याय सहावा
अपरा माया आणि परा माया यातील फरक आपल्याला समजला आहे. दिसणाऱ्या मायेमध्ये म्हणजे अपरा मायेत आप्तस्वकीय, धनदौलत, मानमरातब इत्यादि मोहपाशात गुंतवणाऱ्या गोष्टी येतात तसेच आपण करत असलेले निरनिराळे संकल्प, त्यांना पूर्णत्व येण्यासाठी आपण योजत असलेले विकल्प इत्यादींचाही समावेश यात होतो तर परा मायेत म्हणजे न दिसणाऱ्या मायेत आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या, प्रत्येक प्राण्याच्या स्वभावास अनुकूल अशा इंद्रियांच्या हालचालींचा समावेश होतो. मनुष्य जर परा मायेच्या पंजातून सुटण्यासाठी दैनंदिन जीवनातून वाट्याला येणाऱ्या सुखदु:खांकडे ते मायिक म्हणजे खोटे आहेत हे लक्षात घेऊन, निर्विकारपणे पाहू शकेल तर तो आसक्तीरहित होईल. अशा निरासक्त मनुष्याचा आत्मा मृत्यूनंतर मुक्त होऊ शकतो. परा, अपरा मायेची कल्पना आणखीन स्पष्ट व्हावी म्हणून इसपनीतीतील एक गोष्ट पाहुयात.
एकदा एक करकोचा जंगलात इकडेतिकडे फिरत असताना त्याची आणि एका लांडग्याची गाठ पडली. लांडगा अतिशय दु:खी होता. करकोच्याने दु:खाचे कारण विचारल्यावर लांडगा म्हणाला, बरा भेटलास! अरे, माझ्या गळ्यात एक हाडूक अडकलंय. त्यामुळे मला फार दुखतंय म्हणून मी दु:खी आहे. ते हाडुक तेव्हढं तुझ्या लांब चोचीचा उपयोग करून काढलंस तर मी तुला मोठे बक्षीस देईन. बक्षिसाच्या आशेनं करकोचा सुखावला आणि त्याने मोठ्या खटपटीने, त्याच्या लांब चोचीचा कौशल्याने उपयोग करून, लांडग्याच्या घशातील हाडुक काढले. त्यामुळे लांडग्याला मोठा दिलासा मिळाला. आता लांडगा आपल्याला काय बक्षीस देतोय याची करकोचा मोठ्या आशाळभूतपणे वाट बघू लागला. तेव्हा लांडगा म्हणाला, आता काय हवंय? लांडग्याच्या बोलण्यावर आश्चर्य वाटून करकोचाने त्याला बक्षिसाची आठवण करून दिली. ते ऐकून लांडगा हसला आणि म्हणाला तुझी ही लांबलचक चोच, जी माझ्या घशात आतपर्यंत गेली होती ती सहीसलामत बाहेर आली हे काय लहान बक्षीस आहे का? माझ्या मनात आलं असतं तर तुझ्या या चोचीचे मी तुकडे तुकडे करून टाकले असते, तेव्हा, निघ आता इथून!
गोष्ट संपली. यातून काय बोध घ्यायचा ते पाहू. करकोच्याला मिळालेली लांबलचक चोच ही अपरा मायेतून मिळाली होती. त्याचा उपयोग त्यानं फक्त भक्ष्य उचलण्यासाठी करणं अपेक्षित होतं. त्याऐवजी बक्षिसाच्या आशेनं म्हणजेच, बक्षिसाच्या मोहामुळे तो परामायेच्या जाळ्यात अडकला आणि त्यानं चोचीचा उपयोग स्वत:च्या डोक्याने दुसऱ्याच कामासाठी केला. त्यामुळे तो अडचणीत येऊ शकला असता हे लांडग्याने त्याला दाखवून दिले. आपणही बऱ्याचवेळा आपल्या डोक्याने वेगळंच काहीतरी करायला जातो आणि अडचणीत सापडतो. त्यातून असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ह्याचा प्रत्यय येतो. ईश्वराने आपल्याला दिलेली कौशल्ये हे ईश्वरी अपरा मायेची देणगी आहे आणि तिचा योग्य कारणासाठी उपयोग करणं आपल्या हिताचं असतं, त्याउलट ईश्वरी परा मायेच्या तावडीत सापडल्यास ईश्वरी देणगीचा अयोग्य कारणासाठी वापर घडू शकतो. म्हणून आपण फार सावधगिरीने दैनंदिन व्यवहार करणे आवश्यक आहे. व्यवहारात वागताना दुसरा कसा बेसावध होता हे आपण सहजी सांगू शकतो पण आपल्याबाबतीत स्वार्थ आडवा आल्यामुळे आपण बेसावध राहतो हे सदैव लक्षात ठेऊयात. सावधगिरीने म्हणजे विवेकपूर्ण व्यवहार करण्यासाठी आपण निरपेक्ष होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काय योग्य, काय अयोग्य ह्याचा सहजी उलगडा आपल्याला होत राहील. तो तसा होत राहिला की, परा मायेच्या प्रभावामुळे मोहात अडकणे बंद होईल व परा माया आपोआपच बाजूला सारली जाईल.
क्रमश: