For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपरा उर्फ जड माया आणि परा किंवा चेतन माया

06:30 AM Jan 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
अपरा उर्फ जड माया आणि परा किंवा चेतन माया
Advertisement

आधाय सहावा

Advertisement

मनुष्य जन्माचं चीज होण्यासाठी गणेशतत्व समजून घेणं आवश्यक आहे. ते समजण्यासाठी माया म्हणजे काय ते समजून घ्यावं लागतं. माया ही बाप्पांचीच निर्मिती असून ते स्वत: मात्र त्यापेक्षा निराळे आहेत. त्यामुळे मायेचे स्वरूप समजले की, ते वगळून उरते ते गणेशतत्व होय. पुढे बाप्पा म्हणतात, पृथ्वी, अग्नि, आकाश, अहंकार, उदक, चित्त, बुद्धि, वायु, सूर्य, चंद्र आणि यज्ञ करणारा यजमान अशी अकरा प्रकारची माझी माया आहे. शरीराच्या व्यापारात जरी आत्मा सुसुत्रता आणत असला तरी शरीराच्या हालचाली प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी मायेचे घटकच उपयोगी येतात. मायेच्या मदतीनेच ईश्वर सृष्टीनिर्मिती करतो. सजीवांच्या हालचाली घडवून आणतो. सजीवातील आत्मा वस्तू व व्यक्ती यात गुंतून पडतो. हे गुंतणं किंवा आसक्ती यामुळे आत्मा बद्ध होतो. याउलट जर तो निरासक्त झाला तर मुक्त होऊ शकतो.

मायेमध्ये पंचमहाभूतांचा समावेश होतो. त्यात अहं सर्वात सूक्ष्म आहे. हा अहंभाव सर्व सजीवात आढळून येतो. या अहंभावामुळे एकाच भूमीत जन्माला येऊन ऊस त्याचा गोडपणा आणि मिरच्या त्यांचा तिखटपणा टिकवून असतात. तशीच प्रत्येक वस्तू अहंभावामुळेच तिचे स्वतंत्र अस्तित्व प्रकट करत असते. हा अहंभाव नाश पावू शकत नाही. आपल्याबरोबर दुसऱ्याला वाढू न देणे, इतरांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करणे हे अहंभावाचे लक्षण आहे. वास्तविक पाहता माया ईश्वराची निर्मिती असल्याने ती त्याच्याच सत्तेने काम करते. तिला स्वतंत्र सत्ता नाही पण प्रत्येकाचे अस्तित्व मायेमुळे आहे. मायेच्या अकरा प्रकारांचा उल्लेख बाप्पा श्लोक क्रमांक चारमध्ये करतात. वरील सर्व प्रकार जड असून त्या सर्वांना चेतन ही दुसऱ्या प्रकारची प्रकृती चैतन्य आणते असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

Advertisement

अन्यां मत्प्रकृतिं वृद्धा मुनयऽ संगिरन्ति च ।

तथा त्रिविष्टपं व्याप्तं जीवत्वं गतयानया ।। 5।।

अर्थ- माझी दुसरी अशीच एक जीवरूप, वृद्धा म्हणजे खूप जुनी, अनादि प्रकृती आहे असे मुनिजन सांगतात. जीवभाव म्हणजे चैतन्य प्राप्त झालेल्या या मायेने त्रैलोक्य व्यापले आहे.

विवरण- चौथ्या श्लोकात बाप्पानी त्यांच्या अकरा प्रकारच्या जड प्रकृती म्हणजे जड मायेबद्दल सांगितलं. ही मिथ्या, अचेतन, दु:खदायक, अशुद्ध व पराधीन असून नजरेला दिसणारी म्हणजे अपरा आहे. ती मनाने व बुद्धीने समजून घेता येते. ही जडमाया बुद्धीवर अज्ञानाचे आवरण घालून माणसाला नजरेला दिसणाऱ्या विषयात गुंतवून ठेवते. आसक्त बनवते व त्याचे अध:पतन घडवून आणते. असे असले तरी विवेकाने व ज्ञानाने या जडमायेचा नाश करता येतो. संत साहित्याचा अभ्यास केला की, मायेवर मात कशी करायची ह्याचे ज्ञान मिळते. त्या ज्ञानाचा वापर करून साधक मुक्त होऊ शकतो.

चेतन माया ही जडमायेपेक्षा भिन्न स्वरूपाची असून ती शुद्ध स्वरुपाची असते. ती जडाचे पोषण करते. तिला सत्ता स्फूर्ती प्रदान करते. ती परा म्हणजे नजरेला दिसत नाही. ती अतिशय शुद्ध, सत्वगुणप्रधान असल्याने चैतन्याचे प्रतिबिंब तयार करण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. या दोन प्रकृतीच्या संयोगातून सर्व जगाची निर्मिती होते. आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूत चैतन्य म्हणजे ईश्वरी अंश असतोच. तो ईश्वरी अंश हे ईश्वरी शक्तीचे प्रतिबिंब असतं. मनुष्य, पशुपक्षी, जीवजन्तु, जलचर आदि आपल्याला हालचाल करताना दिसतात याचं कारण ईश्वरी पराशक्ती त्यात असते म्हणूनच. वृक्षही सजीव असतात पण त्यातील परा शक्ती स्वप्नस्थितीत असल्याने अर्धनिद्रित अवस्थेत असते, तर दगड धातू इत्यादि एकाच ठिकाणी स्थिर असलेल्या वस्तूत ती सुप्तावस्थेत असते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.