अपरा आणि परा माया
अध्याय सहावा
माणसाने जन्माला येऊन गणेशतत्व जाणून घ्यावे कारण त्यातच त्याचे भले आहे असं बाप्पा कळकळीने सांगत आहेत. तेच आपले मायबाप असून आपल्या लेकरांचे हित व्हावे अशी हे सांगण्यामागची त्यांची भूमिका आहे. कुणी आपल्या हिताचे सांगत असेल तर माणसाला ते पटते आणि आपण त्याप्रमाणे वागायला हवे हेही त्याला समजते पण मायेचा त्याच्यावर असलेला जबरदस्त पगडा त्याला तसे वागू देत नाही. हेही बाप्पांना माहित आहे म्हणून ते पुढं म्हणतात, राजा गणेशतत्व जाणून घेण्यासाठी मायेचं स्वरूप आधी जाणून घे. माया जाणून घेतलीस की, ती खोटी कशी हे तुझ्या लक्षात येईल. मिथ्या मायेचं ज्ञान झालं की, तिला बाजूला करून तू माझे तत्व सहजी जाणू शकशील. माझे तत्व जाणणे हे खरे ज्ञान होय. त्यासाठी मायेला बाजूला करता यायला हवं कारण जिथे मायेचा प्रभाव असतो तिथे माझ्या तत्वांची बूज राखली जात नाही. माझ्या तत्वाला जर ज्ञान म्हंटलं तर मायेला जाणून घेणं ह्याला विज्ञान म्हणता येईल. विज्ञान म्हणजे आजूबाजूच्या प्रापंचिक वस्तूचे ज्ञान. त्या विज्ञानाला म्हणजे मायेला बाजूला करू शकलास तर तुला सर्वत्र मीच व्यापून राह्यलोय हे लक्षात येईल आणि सर्वाठायी तू समदृष्टीने पाहू शकशील. पुढील श्लोकात, मायेला जाणून घेण्याच्या दृष्टीने बाप्पा प्रकृतीबद्दल म्हणजे मायेबद्दल सविस्तर माहिती देत आहेत.
क्वनलौ खमहङ्कारऽ कं चित्तं धीसमीरणौ ।
रवीन्दू यागकृच्चैकादशधा प्रकृतिर्मम ।। 4 ।।
अर्थ- पृथ्वी, अग्नि, आकाश, अहंकार, उदक, चित्त, बुद्धि, वायु, सूर्य, चंद्र आणि यज्ञ करणारा यजमान असे माझ्या मायेचे अकरा प्रकार आहेत.
विवरण- ईश्वरी अंश असलेला एकच आत्मा निरनिराळ्या शरीरातून जन्मोजन्मी वास करत असतो. आत्मा हा देहाच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे. आयुष्यभर देहाची हालचाल होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या माया या सदरात मोडतात. त्यात पंचमहाभूते, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार युक्त अंत:करण, सूर्य, चंद्र व यज्ञकर्ता यांचा समावेश आहे. भगवद्गीतेत प्रकृतीचं स्वरूप अष्टधा आहे असं सांगितलंय. बाप्पानी त्यात सूर्य, चंद्र आणि यज्ञकर्ता यांची भर घातलीये. सूर्य, चंद्र यांच्यामुळे काळ ही संकल्पना अस्तित्वात आली. सूर्य, चंद्र हे काळाचं दिवस, रात्र असं विभाजन करत असतात.
अपरा म्हणजे बदलू शकणारी व परा म्हणजे न बदलू शकणारी, असे ईश्वराच्या प्रकृतीचे म्हणजे मायेचे दोन भाग आहेत. अपरा म्हणजे दिसणारी आणि परा म्हणजे न दिसणारी माया असेही म्हणता येईल. अपरा मायेच्या मदतीनेच ईश्वर सृष्टीनिर्मिती करतो. त्यात सजीव निर्जीव दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. देहाच्या हालचालींसाठी बदलू न शकणारी म्हणजे अपरा माया आवश्यक असते. मायेचा दुसरा प्रकार म्हणजे परा माया. ही परा माया बोल बोल म्हणता माणसाला गुंडाळून टाकते. परामायेमुळे, मनुष्य क्रिया आणि पदार्थ या दोन गोष्टीत आसक्ती बाळगतो. या आसक्तीमुळे आवडलेल्या वस्तू, व्यक्ती मिळवण्यासाठी मनुष्य जीवाचे रान करतो तसेच परिस्थिती आपल्याला सदैव अनुकूल राहावी म्हणून धडपडत असतो. असे करत असताना त्याच्या हातून बऱ्याचवेळा चांगली अथवा वाईट कर्मे होत असतात आणि त्यांचे फळ भोगण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. अशा पद्धतीने बेमालूमपणे मनुष्याचा आत्मा बंधनात अडकतो. जर त्याने आसक्ती सोडली तर तो कर्मबंधनातून मुक्त होतो. आसक्तीचा परिणाम म्हणून मनुष्य दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांच्यामुळे सुखी किंवा दु:खी होतो. यावरून असे लक्षात येईल की, मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील हालचाली होण्यासाठी अपरा मायेची आवश्यकता असते पण त्याचबरोबर येणारी परा माया माणसाला जखडून टाकते. ते टाळण्यासाठी माणसाने आसक्ती सोडावी.
क्रमश: