गोव्यात आपची ‘महागाई मुक्ती यात्रा’; २६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी दौरा
05:01 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाने (आप) गोव्यात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. पक्षाच्या वतीने २६ नोव्हेंबरपासून ‘महागाई मुक्ती यात्रा’ सुरू करण्यात येणार असून, १९ डिसेंबरपर्यंत ही यात्रा राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघ, जिल्हे आणि गावांमध्ये पोहोचणार आहे.
या यात्रेच्या माध्यमातून आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, घरगुती खर्चात झालेली वाढ आणि महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांवर पडणारा आर्थिक ताण या विषयांवर नागरिकांमध्ये जागृती करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गोव्यात पक्षाच्या सहा कलमी ‘आमची गोएमची गॅरंटी’चा प्रचार करणार आहेत.
Advertisement
सर्वसामान्यांचा आर्थिक भार कमी करण्यावर भर
वाढत्या महागाईच्या काळात गोमंतकीय कुटुंबांना आर्थिक दिलासा देणे, हे पक्षाच्या सहा हमींपैकी पाच हमींचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. ‘महागाई मुक्ती यात्रा’ प्रत्येक मतदारसंघ आणि गावापर्यंत पोहोचवून नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Advertisement
या यात्रेच्या माध्यमातून महागाईचा मुद्दा राज्यभरात जनतेसमोर आणण्याबरोबरच पक्षाच्या हमी योजनांचा प्रचार करण्याची रणनीती आपकडून आखण्यात आली आहे.
Advertisement