चिंता ‘मनी’ सूत्रे
आर्थिक शिस्त, वित्तीय नियोजन व्यक्तिगत पातळीवर महत्त्वाचे असून याबाबत सहज व सोपे सूत्र माहीत असण्यास निर्णय घेणे त्रासदायक ठरत नाही. अर्थार्जन करणे किंवा पैसा मिळवणे यापेक्षा तो नीटपणे सांभाळणे, वाढवणे, आपल्या पूर्वनिश्चित उद्दिष्टाप्रमाणे वापरणे हे कौशल्याचे काम करण्यास काही मार्गदर्शक सूत्रे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
आपली बचत किती प्रमाणात असावी, कर्जाचे सुरक्षित प्रमाण कसे ओळखावे, गुंतवणूक वाढीचे दर किती काळात दुप्पट वाढ करतात. सेवानिवृत्तीनंतर किंवा पेन्शनकरिता किती प्रमाणात गुंतवणूक करणे गरजेचे असते. गुंतवणूक जोखीम किती घ्यावी, स्थावरमत्ता किमान किती परतावा देणे आवश्यक असते. आपल्या उत्पन्नाचे विभाजन गरजा, इच्छा व बचत या त्रांगड्यात कसे बसवले या सर्व प्रश्नांची एकत्रित उत्तरे आपणास आर्थिक स्थैर्य देऊन आनंदी जीवन जगण्यास मदतकारक ठरतात. नवी तंत्रे, नव्या योजना, असंख्य सल्लागार यामुळे नेमके निर्णय कसे घ्यावेत, याबाबत मार्गदर्शन होण्याऐवजी गेंधळ होण्याची शक्यता असते. अशावेळी काही महत्त्वाची अर्थसूत्रे जी सर्वांना सर्वकालिक उपयुक्त ठरतील, अशी अर्थसूत्रे आपण पाहणार आहोत.
आईनस्टाईनचा नियम- आपली गुंतवणूक सातत्यपूर्ण वाढीसाठी त्यामध्ये चक्रवाढ पद्धतीने वाढ होणे आवश्यक असते. त्यामुळे आईनस्टाईन यांनी चक्रवाढ (ण्दस्ज्दल्ह्ग्हु) यास जगातील आठवे आश्चर्य मानले. पैसा वाढीसाठी पुरेसा अवधी देणे आवश्यक असते. घाईने, वेगवान वाढ दर्शवणारे सर्व मार्ग हे शेवटी विनापरतीचे असतात, फसवणारे असतात हे सूत्र प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. माझी गुंतवणूक, दुप्पट, तिप्पट, चारपट होण्यास किती कालखंड लागेल याचे उत्तर ‘परताव्याच्या दरावर’ अवलंबून असते. याकरिता 72 चा नियम, 114 चा नियम आणि 144 चा नियम उपयुक्त ठरतो.
नियम 72 चा- अनेक प्रकारच्या शासकीय पोस्टाच्या, बँकांच्या, वित्तसंस्थांच्या योजना 5 वर्षात, 7 वर्षात, 9 वर्षात दामदुप्पट करून देणाऱ्या असतात. अशा योजनांचा वार्षिक परतावा किती असतो? किंवा जर परतावा दर 6 टक्के माहित असल्यास रक्कम दुप्पट होण्यास किती कालखंड (वर्षे) लागतात, हे समजते. उदा. आपले पैसे दोन वर्षात दुप्पट करतो असे जर म्हटले असेल तर 72 या संख्येला 2 ने भागल्यास 36.5 हे उत्तर आपणास परताव्याचा दर सांगते. जर 6 टक्के परतावा असेल तर 72 संख्येस 6 ने भागल्यास 12 हे उत्तर दुप्पट होण्याचा कालावधी 12 वर्ष व्यक्त करते. क्रेडीट कार्डवर दरमहा 3 टक्के व्याज आपले पैसे मुद्दलाच्या दुप्पट वसूल करते हे लक्षात घेणे यातून स्पष्ट होते. हाच नियम अधिक काटेकोरपणे 70 चा अथवा 69.3 चा म्हणून ओळखला जातो. याच पद्धतीने आपली गुंतवणूक तीनपट होण्यासाठी 114 चा नियम तर गुंतवणूक चारपट होण्यासाठी 144 चा नियम उपयुक्त ठरतो.
गुंतवणुकीचे अक्षयपात्र -4 टक्केचा नियम- आपण केलेली गुंतवणूक कमी न होता त्यातील काही भाग काढणे शक्य आहे का? याचे उत्तर ‘अशक्य’ वाटत असले तरी प्रत्यक्षात 4 टक्केच्या नियमाने जे शक्य होते, यालाच गुंतवणुकीचे ‘अक्षयपात्र’ म्हणता येईल. सध्या विविध म्युच्युअल फंडात एसआयपी करणारे कोट्यावधी गुंतवणूकदार असून त्यांना एस. डब्ल्यूपी म्हणजे शिस्तबद्ध उचल पद्धत (एब्stास्atग्म् wग्tप्drawaत् झ्त्aह) वापरता येते. जर आपल्या गुंतवणुकीच्या वार्षिक 4 टक्के रक्कम काढत राहिलो तरी आपली गुंतवणूक कधीही घटत नाही. याच कालखंडात आपली गुंतवणूक अधिक परतावा (4 टक्क्यांपेक्षा जास्त) निर्माण करीत असल्याने केवळ गुंतवणूक न करता त्याचा वापर करणे हे अधिक शहाणपणाचे ठरते.
जोखीम सूत्र : 100 वजा वय- जोखीम आणि परतावा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेकदा फसव्या योजनांचा प्रसार करणारे जोखीम अत्यंत कमी असल्याचे सांगतात ते पूर्णत: खोटे असते. शेअर्स, म्युच्युअलफंड यात जोखीम असते. कर्जरोख्यात जोखीम कमी राहते. पण आपण किती जोखीम घेणे योग्य असते, याबाबतचा सोपा नियम आपले वय 100 मधून वजा केल्यास येणारे उत्तर ही जोखीम मर्यादा किंवा जोखीम पत्करण्याची लक्ष्मणरेषा ठरते. अन्यथा लोभाचा ‘रावण’ आपली सर्व गुंतवणूक वित्तहरण करू शकतो. समजा अमित यांचे वय 30 असेल तर 100 मधून 30 वजा केल्यास 70 हे उत्तर असे स्पष्ट करते की आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी 70 टक्के भाग जोखीम असणाऱ्या व 30 टक्के सुरक्षित क्षेत्रात करावे. जर संजयचे वय 60 असेल तर फक्त 40 टक्के जोखीम भत्ता व 60 टक्के सुरक्षित भत्ता असे गुंतवणूक प्रमाण ठेवावे. हा नियम व्यक्तीच्या जोखीम घेण्याची मानसिकता, उत्पन्न स्त्रोत बहुविधता यानुसार बदलू शकतो.
आमदनी अठ्ठनी-खर्च सूत्र- आपल्या उत्पन्नाचे विभाजन आवश्यक खर्च, चैनखर्च व बचत यामध्ये काटेकोरपणे न केल्यास आमदनी अठ्ठनी-खर्चा रुपया असे कर्जात नेणारे वळण आणू शकते. एकूण उत्पन्न विभाजन 50-30-20 या सूत्रानुसार करणे महत्त्वाचे ठरते. येथे 50 टक्के इतके आवश्यक गरजा तर 30 टक्के चैन किंवा कमी आवश्यक गरजा व 20 टक्के बचत असे विभाजन करणे महत्त्वाचे ठरते. हे करीत असताना वॉरेन बफे यांनी सुचविल्याप्रमाणे उत्पन्नातून खर्च वजा जाता येणारी बचत असे न करता उत्पन्नात (80 टक्के) आपले सर्व खर्च बसविणे वित्तीय शहाणपण दर्शवते. आता ही बचत चांगल्या गुंतवणूक साधनात गुंतवणे हा पुढचा टप्पा असतो. त्यासाठी गुंतवणूक सुरक्षित, रोकडता असणारी व योग्य परतावा देणारी हवी, हे विसरता कामा नये! यातूनही जर कर्ज घ्यावे लागले तर त्याचे प्रमाण उत्पन्नाच्या 36 टक्के हवे. हा कर्जाबाबतचा 36 टक्केचा नियम आहे.
जीवनसंध्या सुखद हवी!
वृद्धापकाळ अपरिहार्य असला तरी त्याची आर्थिक तरतूद भक्कम असेल तर जीवनसंध्या सुखद ठरते. याकरिता आपल्या खर्चाच्या 25 पट एवढी बचत रक्कम ठेवणे किंवा आपल्या उत्पन्नाच्या 3 पट इतकी रक्कम वयाच्या 40 मध्ये गुंतवावी असा पेन्शन नियम आहे. जर स्थावरमत्ता प्लॉट, फ्लॅट यासारख्या गुंतवणुकी असतील तर तेथे दरमहा 2 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा असणे आवश्यक ठरते. तसे नसल्यास त्या मालमत्तेऐवजी दुसरा पर्याय निवडावा!
खरा परतावा महत्त्वाचा!
अनेक गुंतवणूक परतावे एकूण किंवा ढोबळ परतावे असतात. जसे बँकेत मुदत ठेवीवर 7 टक्के परतावा हा एकूण परतावा असून खरा परतावा मोजण्यास त्यातून महागाई दर वजा करावा लागेल. जर महागाई दर 8 टक्के असेल तर खरा परतावा उणे 1 टक्का होतो. यात पुन्हा व्याज उत्पन्नावर कर द्यावा लागत असेल तर कर पश्चात परतावा मोजावा लागेल! आपण ‘अर्थसुरक्षितता’ हे जीवन ध्येय साध्य करण्यास उपरोक्त अर्थसूत्रे वापरल्यास चिंता मुक्त करणारे हे चिंता ‘मनी’ निश्चितच उपयुक्त ठरतात.
प्रा. डॉ. विजय ककडे