अन्वर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा
पोटनिवडणूक लढविणार नसल्याची घोषणा : काँग्रेसचे करणार समर्थन
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमधील सत्तारुढ डाव्या पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणारे पी.व्हे. अन्वर यांनी सोमवारी स्वत:च्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अन्वर यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेत स्वत:चा राजीनामा सोपविला. नीलांबूचे आमदार राहिलेले अन्वर यांनी पोटनिवडणूक लढविणार नसल्याचीही घोषणा केली आहे. काँग्रेसने या मतदारसंघात स्वत:चा उमेदवार द्यावा, मी त्याचे समर्थन करेन असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने मला विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन विरोधात सभागृहात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सांगितले होते. तसेच सचिवाने विस्तृत तपशील पुरविला होता, जो मी सभागृहात मांडल होता असे म्हणत अन्वर यांनी सतीशन यांची माफी मागितली आहे. सतीशन यांना 150 कोटी रुपये मिळाल्याची बाब मी विधानसभा अध्यक्षांच्या अनुमतीने उपस्थित केली होती. यामागे एखादा कट होता की नाही हे मला माहित नाही. मी विरोधी पक्षनेते आणि जनतेची माफी मागतो असे अन्वर यांनी म्हटले आहे.
नीलांबुरमध्ये मी पोटनिवडणूक लढविणार नाही. पिनाराई सरकार पायउतार करविण्यासाठी मी काँग्रेसच्या उमेदवाराला पूर्ण समर्थन देणार आहे. काँग्रेसने नीलांबुर मतदारसंघात स्वत:चा उमेदवार उभा करावा. मल्लपुरम जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष जॉय हे योग्य उमेदवार ठरतील असे वक्तव्य अन्वर यांनी केले आहे. माझा राजीनामा स्वीकारायचा की नाही हे विधानसभा अध्यक्ष ठरवतील. राजीनामा देण्यापूर्वी मी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. केरळमध्ये सर्वात गंभीर मुद्दा प्राणी अन् माणसांमधील संघर्षाचा असल्याचे त्यांना सांगितले. तसेच हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी बॅनर्जी यांच्याकडे केली आहे. संसदेत हा मुद्दा उपस्थित करत यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याकरता त्या तयार असल्याचा दावा अन्वर यांनी केला आहे.
स्थापन केला होता पक्ष
अन्वर यांनी काही महिन्यांपूर्वी एलडीएफची साथ सोडली होती. तर अलिकडेच त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अन्वर हे केरळच्या नीलांबुर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी यापूर्वी डेमोक्रेटिक मूव्हमेंट ऑफ केरळ नावाच्या पक्षाची स्थापना केली होती.