कोरियन चित्रपटात अनुष्का सेन
अभिनेत्री अनुष्का सेनने मोठे यश मिळविले आहे. दक्षिण कोरियन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरणार आहे. 23 वर्षी अनुष्का आगामी रोमँटिक म्युझिकल ड्रामा ‘जेजू ओले’मध्ये काम करणार आहे. हा चित्रपट भारत आणि दक्षिण कोरियादरम्यान एक सांस्कृतिक सहकार्याचा प्रोजेक्ट असणार आहे. चित्रपटात अनुष्काने अलीशा नावाची भूमिका साकारली असून ती स्वत:च्या बहिणीला गमाविण्याच्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत दक्षिण कोरियातील सुंदर बेट जेजूवर पोहोचते. तेथे ती स्वत:च्या भावना समजून घेत आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करते, तर गायक-गीतकार सुनवू (कोरियन अभिनेता कांग ह्युंग-सेओकने साकारलेली भूमिका)सोबत तिचे नाते जडते. चित्रपटाची कहाणी जेजू बेटाच्या सुंदर ठिकाणांवर आधारित आहे. दक्षिण कोरियाचा हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी निर्माण करण्यात आला आहे. तर याचे चित्रिकरण पूर्ण जेजू बेटावर पार पडले आहे. सध्या हा चित्रपट दक्षिण कोरिया, भारत आणि अन्य आशियाई तसेच मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे.