अनुपचा चित्रपट क्षेत्रातील संघर्षमय प्रेरणादायी प्रवास
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
अनुप जत्राटकर यांना लहानपणापासूनच लिखाणाची आवड होती. त्यांनी शालेय जीवनातच कविता लिहून सादरही केल्या होत्या. कॉलेज जिवनात इतर तरूण मौज-मजा करीत असताना अनुप लग्नासह इतर कार्यक्रमाचे फोटो काढून पैसे कमवत होता. जमा झालेल्या पैशातून ‘शिकार’ नावाचा पहिला लघुपट तयार केला. दरम्यान 34 लघुपटाचे लेखन केले. परंतू 2024 ला प्रदर्शित झालेल्या अनुप जत्राटकर लिखित व दिग्दर्शित ‘गाभ’ या चित्रपटाला ‘कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट‘ आणि ‘कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक‘ असे दोन पुरस्कार मिळाले.या पुरस्कारापर्यंत पोहचण्याचा संघर्षमय प्रवास ‘तरूण भारत संवाद’शी बोलताना अनुपने उलघडून सांगितला.

अनुप निपाणीसारख्या निमशहरी आणि सीमाभागातला रहिवासी आहे. कॉलेज जीवनापासूनच चित्रपट निर्मितीचे वेड असल्याने बारावीपासूनच कॅमेरा हाताळायला सुरूवात केली. लग्नासह इतर कार्यक्रमांचे फोटो काढण्याचा व्यवसाय केला. फोटोग्राफीमधून जमा झालेल्या पैशातून बीए. भाग तीनमध्ये त्यांनी ‘शिकार’ नावाचा लघुपट तयार केला. या लघुपटाचे प्रदर्शन एम.ए. प्रथम वर्षात ऑगस्ट महिन्यात केले. दरम्यान अनुपने 34 लघुपट, माहितीपट आणि जाहिरातीचे लेखन, दिग्दर्शन केले. या लघुपटांना 28 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. एवढेच नाही तर ‘निष्पर्ण पिंपळाच्या छायेत’ हा एकांकिका संग्रह लिहला आहे. ‘गाभ’ चित्रटाचे लिखाण 2018 ला सुरू केले. लेखन पूर्ण झाल्यावर या चित्रपटातील गाण्यांचे चित्रिकरण 2019 च्या होळीच्या दिवशी केले. मुसळधार पावसामुळे चित्रीकरण लांबले. पुन्हा 2020 फेब्रुवारीत चित्रिकरण सुरू केले. चित्रिकरण संपत आले आणि कोरोनाच्या लॉकडाऊनची लाट आली. या चित्रपटाचे काही तंत्रज्ञ कोरोनात गमावले. पुन्हा कामाला सुरूवात करून 2022 ला ‘गाभ’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले. डिसेंबर 2022 ला सेंसॉर बोर्डाने या चित्रपटाला मान्यता दिली. तोपर्यंत हा चित्रपट वेगवेगळया राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिरत राहिला. 2024 ला रितसर चित्रपट गृहात ‘गाभ’ चित्रपट प्रदर्शित केला.
या चित्रपटाला आत्तापर्यंत 42 नामांकन मिळाली त्यापैकी 28 पुरस्कार आहेत. परंतू ऑगस्ट महिन्यातील पहिला लघुपट आणि याच महिन्यात ‘गाभ’ चित्रपटाला मिळालेले दोन पुरस्कार हा योगागोगच म्हणावा लागेल. गेल्या 19 वर्षातील चित्रपट क्षेत्रातील अनुपचा संघर्षमय प्रवास थक्क करून टाकणारा आहे. चित्रपट निर्मिर्तीच्या क्षेत्रात अनेक प्रसंगांचा सामना केला, पण अनुपने हार मानली नाही. आपले स्वप्न, आपली आवड पूर्णत्वास नेण्यासाठी सतत प्रयत्न केले. हा संघर्षमय प्रवास तरूणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
- चित्रपटाची कहाणी
कोल्हापुरातील एका गावातील प्रेम कहाणी, त्यासोबतचा माणूस आणि प्राणी यांच्यातील नातेसंबंधावर हा चित्रपट तयार केला आहे. ग्रामीण भागातील अस्सल रांगड्या तरुणाच्या भोवती फिरणारी ही कथा असली तरी तिच्या केंद्रस्थानी म्हैस व रेडा आहे. कारण या म्हैशीमुळे या तरुणाच्या वागण्यात आणि जगण्यात कसा बदल होत जातो. शिवाय तो तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमकहाणी कशी फुलत जाते हे दर्शविणारा हा चित्रपट आहे.

- चित्रपटातील कलाकार
‘गाभ’ चित्रपटात कैलास वाघमारे, सायली बांदकर, उमेश बोळके, विकास पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील संगीत व गाणी चंद्रशेखर जनवाडे यांची आहे. निर्मिती मंगेश गोटुरे, लेखन,दिग्दर्शन अनुप जत्राटकर, संकलन रवींद्र चांदेकर यांनी केले. कला दिग्दर्शन कै. सुंदर कांबळे यांनी केले आहे. चित्रपटातील सर्वच भुमिका सर्वसामान्य घरातील मुला-मुलींनी साकारल्या आहेत.
- एक नवीन कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘गाभ’ चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. कोल्हापुरच्या मातीतील नातेसंबंध उलगडणारा एक नवीन विषय हाती घेतला आहे. या विषयावरील चित्रपटाचे चित्रीकरण दिवाळीनंतर सुरू करणार आहे. त्यामुळे लवकरच एक नवीन कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
- कोल्हापुरला गतवैभव मिळवून देण्यासाठी तरूणांनी एकत्र यावे
कोल्हापुरात चित्रपट निर्मितीची सुरूवात झाली. कोल्हापुरने अनेक चित्रपटांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान निर्माण करून दिले. त्यामुळे कलापंढरी म्हणून कोल्हापुरची चित्रपट सृष्टीत ओळख निर्माण झाली आहे. या कोल्हापुरला गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी तरूण चित्रपट लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांनी एकत्र येऊन चित्रपट निर्मिती केली पाहिजे.
- अनुप जत्राटकर, लेखक, दिग्दर्शक