झेंगला नमवून अनुपमाची विजयी सलामी
झेंगला नमवून अनुपमाची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ शेनझेन (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या एकेरीतील सलामीच्या सामन्यात भारताच्या अनुपमा उपाध्यायने अमेरिकेच्या 15 व्या मानांकीत झेंगचा पराभव करत दुसरी फेरी गाठली.
महिला एकेरीच्या मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात 19 वर्षीय अनुपमाने केवळ 48 मिनिटांत अमेरिकेच्या झेंगचे आव्हान 21-17, 8-21, 22-20 अशा गेम्समध्ये संपुष्टात आणले. महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत अनुपमा 50 व्या स्थानावर आहे. अनुपमा उपाध्यायने यापूर्वी कझाकस्थानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तसेच पोलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपदे मिळविली होती. अनुपमाचा दुसरा फेरीतील सामना जपानच्या नात्सुकी निदायरा बरोबर होणार आहे.
या स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या बी. सुमित रे•ाr आणि एन. सिक्की रे•ाr यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. पहिल्या फेरीतील सामन्यात सुमित आणि सिक्की या जोडीने अमेरिकेच्या प्रेस्ले स्मिथ आणि जेनी गाय यांचा 23-21, 17-21, 21-17 अशा गेम्समध्ये 63 मिनिटांच्या कालावधी पराभव केला. सुमित आणि सिक्की यांचा पुढील फेरीतील सामना चीनच्या फेंग झी आणि हुवाँग पिंग बरोबर होणार आहे.
भारताच्या प्रियांशु राजावतला पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. चिको वार्दोयोने राजावतचा 22-24, 21-13, 21-18 असा पराभव केला. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या मियाझाकीने भारताच्या आकर्शी कश्यपवर 21-10, 21-18 अशा गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.