For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात 4 लाख जनावरांना लाळ्या प्रतिबंधक लस

10:36 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात 4 लाख जनावरांना लाळ्या प्रतिबंधक लस
Advertisement

बेळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 85 हजार 756 जनावरांना लाळ्या प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण मोहिमेंतर्गत 1 एप्रिलपासून लाळ्या प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. घरोघरी जावून पाच महिन्यांवरील सर्व जनावरांना लस देण्यात येत आहे. एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारीही घेतली जात आहे. जिल्ह्यात 13 लाखांहून अधिक मोठ्या जनावरांची संख्या आहे. गाय, म्हैस आणि बैलांना लाळ्या प्रतिबंधक लस दिली जाते. लाळ्याखुरकत हा भयानक रोग असून याची लागण झाल्यास जनावरांच्या पायतोंडाला पुरळ उठून जनावर अशक्त होते. रोगाची तीव्रता अधिक असल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारी म्हणून पशुसंगोपन खात्यामार्फत वर्षातून दोनवेळा प्रतिबंधक लस दिली जाते. सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी, असे आवाहनही खात्याने केले आहे.

Advertisement

अलिकडे जनावरांना लम्पी, लाळ्या आणि इतर रोगाची लागण होवू लागली आहे. त्यामुळे पशुपालकांना फटका बसू लागला आहे. खबरदारी म्हणून जनावरांना वेळोवेळी प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र काही पशुपालक मनात गैरसमज ठेवून जनावरांना लसीकरणापासून वंचित ठेवतात. त्यामुळे भविष्यात रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी कोणताही गैरसमज न ठेवता सर्व जनावरांना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लाळ्याखुरकत रोगाची लागण झाल्यास जनावरांच्या दूध क्षमतेत मोठी घट होते. त्यामुळे आर्थिक फटकाही बसू शकतो. यासाठी पशुपालकांनी सतर्क राहून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. पशुसंगोपन खात्यामार्फत घरोघरी जावून जनावरांना लसीकरण केले जात आहे. एप्रिल महिन्यात ही मोहीम सर्वत्र अधिक तीव्रतेने राबविली जात आहे. यासाठी गावोगावी नेमण्यात आलेल्या पशुसखींची मदतही होऊ लागली आहे. जिल्ह्यात 28 लाख जनावरे आहेत. यापैकी गाय, म्हैस, बैल यांना ही लस टोचली जात आहे. जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी पशुसंगोपन खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक गोठ्यापर्यंत जावून जनावरांना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात योग्य तो लसीकरणाचा साठा करण्यात आला आहे.

डॉ. राजीव कुलेर-सहसंचालक पशुसंगोपन खाते

Advertisement

जिल्ह्यात 13 लाखांहून अधिक मोठ्या जनावरांची संख्या आहे. आतापर्यंत 1 लाख 85 हजार 360 गाय आणि बैलांना तर 3 लाख 396 म्हशी आणि त्यांच्या रेडकांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पशुपालकांनी सर्व जनावरांना लसीकरण करून घेऊन सहकार्य करावे.

Advertisement
Tags :

.