सर्पदंशानंतर टोचले अँटी-रेबीजचे इंजेक्शन
उत्तरप्रदेशातील धक्कादायक घटना
वृत्तसंस्था, संभल
घराच्या अंगणात खेळत असलेल्या 4 वर्षीय चिमुरड्याला साप चावतो, त्यानंतर कुटुंबीय या मुलाला घेऊन सरकारी रुग्णालयात पोहोचतात, परंतु तेथे उपचाराच्या नावावर झालेल्या निष्काळजीपणामुळे मुलाचा जीव धोक्यात सापडतो. सर्पदंशानंतर अँटी वेनम इंजेक्शनची आवश्यकता असताना मुलाला अँटी रेबीज इंजेक्शन देत घरी पाठविण्यात आले. यानंतर मुलाची प्रकृती सातत्याने बिघडले आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली. सुमारे 10 दिवस मुलाने मृत्यूशी यशस्वी झुंज दिली.
हा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशच्या संभल येथील शासकीय रुग्णालयात घडला आहे. तेथील अबुल हसन यांच्या चार वर्षीय मुलाला 10 दिवसांपूर्वी सापाने चावले होते. तर सरकारी रुग्णालयात रेबीजविरोधी इंजेक्शन देण्यात आल्याने या मुलाची प्रकृती बिघडली, यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यावर आता या मुलाची प्रकृती बरी झाली आहे.
सर्पदंशानंतर मुलाला त्याच्या भावाने शासकीय रुग्णालयात नेले होते. तेथे साप चावला असूनही एंटी वेनमएवजी अँटी रेबीज इंजेक्शन देण्यात आले. तसेच मुलाला काही औषधे देत घरी पाठविण्यात आले होते. नंतर प्रकृती बिघडल्यावर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
हा प्रकार समोर आल्यावर राज्याच्या आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. आरोग्य विभागाच्या महासंचालकांनी चौकशी करवत कारवाईचे निर्देश दिले. यानंतर संभलचे जिल्हाधिकारी अंकित खंडेलवाल यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करविली. या चौकशीत फार्मासिस्ट मनोज कुमारची भूमिका आणि कुटुंबीयांनी केलेले आरोप खरे आढळून आले. यानंतर फार्मासिस्टला निलंबित करण्यात आले आहे.