‘पीओके’मध्ये पाकिस्तानविरोधी आंदोलन तीव्र
600 लोकांच्या अटकेनंतर भारताकडे मागितली मदत
वृत्तसंस्था
इस्लामाबाद
सरकारच्या कारवाईनंतर आणि 600 हून अधिक नागरी हक्क कार्यकर्त्यांच्या सामूहिक अटकेनंतर पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये (पीओके) पाकिस्तानविरोधी मोठी आंदोलने सुरू झाली आहेत. प्रमुख आंदोलन नेते शौकत नवाझ मीर यांच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या जॉइंट आवामी अॅक्शन कमिटीने (जेएएसी) पाकिस्तानी सरकारला उघड आव्हान देतानाच भारताकडे मदतीची मागणी केली आहे. आपल्या नेत्यांच्या अटकेवर ‘जेएएसी’ने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जम्मू काश्मीर ‘जेएएसी’चे प्रमुख सदस्य सरदार अमन खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी राजवटीखालील तीव्र दबाव, क्रूरता आणि भीषण मानवी संकटावर प्रकाश टाकण्यात आला आहे. येथे अन्नधान्य, औषधांची टंचाई असल्याने आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, असे त्यांनी भारताला उद्देशून म्हटले आहे. पाकिस्तानी नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी स्थानिकांची असलेली तीव्र इच्छा अधोरेखित करताना ‘जेएएसी’ नेत्याने सीमारेषा रद्द करण्याची मागणीही केली. तसेच आम्हाला शस्त्रसंधी रेषा संपवायची आहे, आणि आम्हाला तुमच्या समर्थनाची गरज असल्याचेही नमूद केले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर टीका करत, अमन खान यांनी स्थानिक जनता आता इस्लामाबादच्या धमक्यांपुढे झुकणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.