For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शत्रूराष्ट्राचा जयजयकार, जनतेचा रुद्रावतार

11:33 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
शत्रूराष्ट्राचा जयजयकार  जनतेचा रुद्रावतार
Advertisement

कैद्याने देशविरोधी घोषणा देताच यथेच्छ धुलाई : न्यायालय आवारातील नाट्या

Advertisement

बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने न्यायालय आवारात देशविरधी घोषणा दिल्या. बुधवारी सकाळी एका गुन्हेगारी प्रकरणात न्यायालयीन कामकाजासाठी पोलिसांनी त्याला कारागृहातून न्यायालयात आणले असता ही घटना घडली असून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देताच त्या कैद्याला चोप देण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. कारागृहात शिक्षा भोगत असतानाही आपल्या कारनाम्याने अधूनमधून ठळक चर्चेत येणाऱ्या जयेश ऊर्फ जयेशकांत ऊर्फ शाहीर ऊर्फ शाकीर, रा. पुत्तूर, जि. शिमोगा याच्यावर येथील मार्केट पोलीस स्थानकात (82/2024) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भादंवि 295ए, 153, 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशविरोधी घोषणा देणाऱ्या कैद्याला अटक करण्यात आली. एपीएमसी पोलीस स्थानकातील सिदलिंगप्पा हणबरट्टी या पोलीस हवालदाराने सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल झाला आहे. बुधवारी दिवसभर जयेशची एपीएमसी पोलीस स्थानकात कसून चौकशी करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु., गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची आदींनी त्याची चौकशी केली.

2018 मध्ये एडीजीपी अलोककुमार यांना जयेशने धमकावले होते. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात (139/2018) भादंवि 506, 507 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आले होते. या खटल्याच्या कामकाजासाठी एपीएमसी पोलिसांनी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जयेशला कारागृहातून न्यायालय आवारात आणले होते. न्यायालयाबाहेर थांबलेले असताना सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास जयेशने ‘पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कैद्याने अचानक घोषणाबाजीला सुरुवात केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या परिसरातील नागरिक व काही वकिलांनी त्याला अद्दल घडविण्यासाठी पुढे सरसावले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप देण्यास सुरुवात केली. याचवेळी पोलिसांनी सुरक्षितपणे त्याला न्यायालय आवारातून बाहेर काढले. तातडीने पोलीस वाहनातून एपीएमसी पोलीस स्थानकात देण्यात आले. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून सुटका करून जयेशला ताब्यात घेतले. त्यावेळीही त्याने या व्यवस्थेविरुद्ध शिवीगाळ करणे सुरूच ठेवले होते. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा आरडाओरडा सुरूच होता. मात्र, नागरिकांचा संताप लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला तेथून बाहेर काढले. या प्रकारामुळे न्यायालय आवारात काही काळ गोंधळ उडाला.

Advertisement

सखोल चौकशी करणार

यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याशी संपर्क साधला असता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. जयेशने देशविरोधी घोषणा का दिल्या? कारागृहातील त्याचे साथीदार कोण? यामागचा त्याचा उद्देश काय आहे? याची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती त्याची जबानीही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.