कोलकात्यातील विद्यापीठात देशविरोधी कृत्य
आझाद काश्मीर, फ्री पॅलेस्टाइनचे चित्र : डाव्या संघटनांचा हात असल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या जादवपूर विद्यापीठातील भिंतीवर आझाद काश्मीर आणि फ्री पॅलेस्टाइनचे चित्र (ग्रॅफिटी) तयार करण्यात आले आहे. 10 मार्च रोजी परीक्षा सुरू असताना ही ग्रॅफिटी तयार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तेथे दाखल होत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांच्या विरोधात एफआयआर नेंदविण्यात आला आहे. विद्यापीठातील एक प्राध्यापक सत्तारुढ तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारानजीकच्या भिंतीवर चित्र काढण्यात आले तसेच फॅसिस्ट शक्तींना संपविले जावे असा मजकूर त्यावर आहे. चित्र काढण्यामागे कुठल्या संघटनेचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आम्ही फुटिरवादाचे समर्थन करत नाही. आम्ही भाजपशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आहोत असा दावा जादवपूर विद्यापीठातील डाव्यांची विद्यार्थी संघटना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) नेते अभिनव बसू यांनी केला. फुटिरवादी विचारांचे समर्थन करणाऱ्या कुठल्याही पोस्टर अन् भित्तिचित्राच्या (ग्रॅफिटी) विरोधात आम्ही आहोत असे विद्यापीठातील प्राध्यापक आणि तृणमूलशी संबंधित ओमप्रकाश मिश्रा यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी जादवपूर विद्यापीठात निदर्शने झाली होती. 1 मार्च रोजी विद्यापीठ परिसरात डाव्या संघटनेच्या निदर्शनांदरम्यान राज्याचे शिक्षणमंत्री व्रत्य बासू यांच्या कारची धडक बसल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले होते. मंत्री बासू, प्राध्यापक ओमप्रकाश मिश्रा यांच्यावर हिंसेशी निगडित प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला होता. एसएफआयचा खरा चेहरा लोकशाहीविरोधी आणि अनियंत्रित आहे. डाव्या संघटनांनी विद्यापीठातील शांततापूर्ण वातावरण बिघडविले असल्याचा आरोप व्रत्य बासू यांनी केला आहे.