मालदीवमध्ये भारतविरोधी मुइज्जूंची सरशी
संसदीय निवडणुकीत मिळाले मोठे यश
वृत्तसंस्था/ माले
मालदीवमध्ये इंडिया आउट मोहीम राबविणारे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचा पक्ष संसदीय निवडणुकीत विजयी ठरला आहे. प्रारंभिक निकालानुसार 93 जागांपैकी 66 जागांवर मुइज्जू यांचा पीपल्स नॅशनल काँग्रेस हा पक्ष विजयी ठरला आहे. अधिकृत निकालाची घोषणा सुमारे 7 दिवसांनी होणार आहे. मालदीवच्या संसदेचा कार्यकाळ मे महिन्यात सुरू होणार आहे. मुइज्जू यांचा विजय भारतासाठी एक मोठा झटका आहे.
भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या नजरा या निवडणुकीच्या निकालावर लागून राहिल्या होत्या. सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मालदीवमध्ये स्वत:चा प्रभाव वाढविण्याची इच्छा दोन्ही देशांची आहे. मुइज्जू यांचा पक्ष विजयी ठरल्याने आता मालदीवमध्ये आगामी 5 वर्षांपर्यंत चीनसमर्थक सरकार सत्तेवर असणार आहे.
मुइज्जू यांच्या पक्षाला मागील संसदीय निवडणुकीत केवळ 8 जागा जिंकता आल्या होत्या. यामुळे अध्यक्षपद मिळवूनही मुइज्जू यांना स्वत:च्या धोरणांनुसार विधेयके संमत करविणे अवघड ठरले होते. परंतु आता 66 जागांवर यश मिळाल्याने मुइज्जू यांना विरोधी पक्षांच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागणार नाही.
या निवडणुकीत भारत समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालदीव डेमोक्रेटिक पार्टीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. एमडीपीने 89 उमेदवार उभे केले होते, यातील सुमारे 12 जणांनाच यश मिळू शकले आही. भूराजकारणचा मुद्दा या निवडणुकीत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला होता. मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांना देशाबाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते.
अब्दुल्ला यामीन दोषमुक्त
मालदीवच्या एका उच्च न्यायालयाने चीनसमर्थक माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. यामीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. यामुळे त्यांना 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुइज्जू हे अध्यक्ष झाल्यावर यामीन यांना तुरुंगातून बाहेर काढत स्थानबद्ध ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यामीन आता राजकारणात पुन्हा सक्रीय होऊ शकतात. परंतु मुइज्जू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाला ते साथ देण्याची शक्यता कमी आहे.