ब्रिक्सपूर्वी भारतविरोधी जनरलला हटविले
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा निर्णय
वृत्तसंस्था, बीजिंग
पुढील महिन्यात नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेनिमित्त चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या चर्चेदरम्यान बीजिंगने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गलवान आणि डोकलामध्ये चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांसोबत झटापट करण्याचा आदेश देणाऱ्या सैन्य जनरलला चीनच्या सर्वोच्च राजकीय सल्लागार संस्थेतून हटविण्यात आले आहे. जनरल झाओ जेंगकी हा सैन्याधिकारी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचा कमांडर म्हणून तैनात होता. झाओ यांनाच भारतासोबत सीमेवर तणावासाठी जबाबदार ठरविण्यात आले होते.
झाओ यांना ‘चायनजी पीपल्स पॉलिटिकल कंसल्टेटिव्ह कॉन्फरन्स’ (सीपीपीसीसी) आणि दोन अन्य पदांवरून हटविण्यात आले. भारतासोबत लागून असलेल्या सीमेसमवेत चीनच्या पश्चिम सीमांवर सैन्य अभियानांची देखरेख करणाऱ्या ‘वेस्टर्न थिएटर कमांड’चे ते पहिले कमांडर होते. हा नावा घटनाक्रम जिनपिंग यांच्याकडून देशाच्या सशस्त्र दलांमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात राबविण्यात येणाऱ्या मोठ्या अभियानाचा हिस्सा असल्याचे मानले जातेय.
जनरल झाओ जोंगकी कोण?
झाओ हे वयाच्या 16 व्या वर्षी पीएलएमध्ये सामील झाले होते. 1979 च्या व्हिएतनाम विरोधी युद्धात त्यांनी भाग घेतला होता. झाओ यांनी 1986-88 पर्यंत पीएलएच्या भाषा संस्थेत अरबी भाषेचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर झाओ यांनी टांझानियामध्ये चिनी दूतावासात मिलिट्री अटॅची म्हणून काम केले होते.
2015 मध्ये जनरलपदी
1989 साली चीनमध्ये परतल्यावर झाओ यांनी सैन्यात अनेक वरिष्ठ पदांवर काम केले. 1990 मध्ये त्यांना नव्याने स्थापन माउंटेन ब्रिगेडचे पहिले कमांडर नेमण्यातत आले आणि त्यानंतर तिबेट सैन्यक्षेत्रात त्यांनी सेवा बजावली आणि पीएलएच्या 13 व्या आणि 14 व्या ग्रूप आर्मीची धुरा सांभाळली. 2007 साली ते जिनान सैन्य क्षेत्राचे चीफ ऑफ स्टाफ झाले. 2009 साली लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांना पदोन्नत करण्यात आले. 2012 मध्ये जिनान सैन्य क्षेत्राचे कमांडर होत कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीत सामील झाले. 2015 साली त्यांना जनरलपदी बढती मिळाली. तर 2016 साली झाओ यांना वेस्टर्न थिएटर कमांडचे पहिले कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
भारताशी कनेक्शन
झाओ यांना भारताच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणे आणि गलवान खोऱ्यातील सैन्य अभियानाला मंजुरी देणारे प्रमुख चिनी सैन्य रणनीतिकार म्हणून ओळखले जाते. तर 2017 चा डोकलाम तणाव आणि मग 2020 साली भारतासोबत गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीदरम्यान तेच धुरा सांभाळत होते.