तीन शेजारी देशांचा भारतविरोधी कट
‘सार्क’ला पर्यायी संघटना स्थापन करण्याची चीन, पाकिस्तान, बांगलादेशची योजना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे वाढते जागतिक महत्व सलणाऱ्या, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी भारताविरोधात व्यापक कारस्थान रचले आहे. भारताच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या ‘सार्क’ या भारतीय उपखंडातील देशांच्या संघटनेला पर्याय म्हणून या तीन देशांनी एकत्र येऊन नवी संघटना स्थापन करण्याची योजना केली आहे.
सार्क ही संघटना आता नाममात्र उरली असल्याचा कांगावा या देशांनी केला आहे. त्यामुळे नवी विभागीय संघटना स्थापन करण्याची आवश्यकता आहे. यासंबंधी चीन आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा आता पुढच्या टप्प्यापर्यंत पोहचली आहे. सार्क संघटनेत भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव आणि नेपाळ या देशांचा समावेश आहे. नव्या संघटनेच्या योजनेत भारताला वगळले जाण्याची शक्यता असून चीन, बांगलादेश आणि पाकिस्तान हे देश प्रथम ही संघटना स्थापन करणार आहेत, अशी माहिती आहे.
तीन देशांची बैठक
चीनच्या कुनमिंग येथे नुकतीच चीन पाकिस्तान आणि बांगला देश या तीन देशांची बैठक झाली आहे. या बैठकीत नव्या संघटनेची रुपरेषेसंबंधी बोलणी झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आतापर्यंत या तीन देशांपैकी कोणीही या वृत्ताला दुजोरा दिला नसला, तरी हालचाली स्पष्टपणे होत असल्याचे दिसून येत आहे.
बांगलादेशकडून इन्कार
भारताला वगळून आणि सार्कला पर्याय म्हणून नवी संघटना स्थापन केली जाणार असल्याचा बांगला देशच्या सरकारकडून इन्कार करण्यात आला आहे. अशी कोणतीही योजना विचाराधीन नाही. चीनमध्ये झालेली तीन देशांची बैठक राजकीय नव्हती. या बैठकीत नव्या संघटनेसंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा बांगला देश प्रशासनाकडून सोमवारी करण्यात आला आहे.
उरी हल्ल्यानंतर...
2016 मध्ये पाकिस्तानात सार्क संघटनेची शिखर परिषद होणार होती. तथापि त्याच वर्षाच्या 18 सप्टेंबरला जम्मू-काश्मीरमधील उरी येथे भारतीय सेनेच्या तळावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेचा निषेध म्हणून भारताने या शिखर परिषदेत भाग घेण्यास नकार दिला होता.