भारतविरोधी कट, कॅनडात मोठी कारवाई
खलिस्तान समर्थक ड्रग नेटवर्कचा भांडाफोड
वृत्तसंस्था/ओटावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी7 शिखर परिषदेत सामील होण्यासाठी कॅनडाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी कॅनडातील मार्क कार्नी सरकारने भारतविरोधी कारवायांमध्ये सामील खलिस्तानसमर्थकांना पकडण्यासाठी ‘प्रोजेक्ट पेलिकन’ नावाची मोहीम राबविली आहे. याच्या अंतर्गत कॅनडाच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत खलिस्तान समर्थक ड्रग्ज आणि दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड केला आहे. कॅनडाच्या पोलिसांनी प्रोजेक्ट पेलिकन अंतर्गत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. याच्या अंतर्गत पोलिसांनी 479 किलो कोकेन जप्त केले असून याची किंमत सुमारे 47.9 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.
याचबरोबर पोलिसांनी कॅनडात राहत असलेल्या भारतीय वंशाच्या 7 जणांसह एकूण 9 जणांना अटक केली आहे. ही टोळी अमेरिका आणि कॅनडादरम्यान ट्रक्समधून अमली पदार्थ पाठवत होते. टोळीचे मेक्सिको ड्रग कार्टेल आणि अमेरिकेतील अमली पदार्थ तस्करांशी संबंध होते. अमली पदार्थ विक्रीतून मिळणारी रक्कम भारतविरोधी कारवायांसाठी वापरली जात होती. भारतविरोधी निदर्शने, खलिस्तानसाठी कथित जनमत संग्रह, शस्त्रास्त्रखरेदीकरता ही रक्कम खर्च केली जात होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय या ड्रग नेटवर्कला पाठबळ पुरवित असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. मेक्सिकन कोकेन आणि अफगाण हेरॉइनच्या तस्करीसाठी खलिस्तानी समुहांचा वापर आयएसआयकडून केला जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कारवाई
कॅनडाच्या कनानास्किसमध्ये जी-7 शिखर परिषद आयोजित होणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणानुसार पंतप्रधान मोदी हे या परिषदेत सहभागी होणार आहेत. कार्नी यांनी मागील आठवड्यात पंतप्रधान मोदींना फोन करत परिषदेत सामील होण्याचे निमंत्रण दिले होते. जी-7 परिषद 15-17 जूनदरम्यान आयोजित होणार आहे. या पार्श्वभूमीवर खलिस्तान समर्थक ड्रग्ज नेटवर्कवर कॅनडा पोलिसांनी कारवाई केली आहे.