For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतविरोधी टिप्पणीप्रश्नी मालदीवची शरणागती

06:51 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतविरोधी टिप्पणीप्रश्नी मालदीवची शरणागती
Advertisement

वृत्तसंस्था/ माले, नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मरियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महझूम माजीद या मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले आहे. वादग्रस्त टिप्पण्यांसाठी जबाबदार असलेल्या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे मालदीव सरकारचे प्रवक्ते व मंत्री इब्राहिम खलील यांनी स्पष्ट केले. एकंदर भारताने वेळीच आक्षेप नोंदवल्यानंतर मालदीवने शरणागती स्विकारत संबंधितांवर कठोर कारवाई केल्याचे दिसून येत आहे.

मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली होती. भारताने मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे हा मुद्दा मांडला होता. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. भारताच्या आक्षेपानंतर मालदीव सरकारने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे निवेदन जारी करतानाच मंत्र्यांच्या टिप्पण्या मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे सांगितले होते. तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा वाद वाढत असल्याचे दिसून येताच सरकारने तीन मंत्र्यांवर तत्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करत भारत-मालदीव यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अबाधित राखण्याचे प्रयत्न केले आहेत.

Advertisement

याप्रकरणी मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मालदीव सरकारच्या मंत्र्यांकडून सोशल मीडियावर भारताविरोधात वापरण्यात येत असलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा मी निषेध करतो, असे ते म्हणाले. भारत हा मालदीवचा नेहमीच चांगला मित्र आहे आणि आम्ही अशा कठोर टिप्पण्यांमुळे आमच्या दोन्ही देशांमधील जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. मालदीव नॅशनल पार्टीनेही आपल्या सरकारच्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

वादग्रस्त ट्विट अन् भारताचा आक्षेप

अलिकडेच पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर त्यांनी या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच त्यांनी भारतीयांना या बेटाला भेट देण्याची योजना आखण्याचे आवाहन केले होते. यासंबंधी मालदीवच्या युवा सक्षमीकरण उपमंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मात्र, त्यांच्या या ट्विटवर टीका होताच त्यांनी ते डिलीटही केले. याचदरम्यान मरियम शिउना यांच्या या ट्विटवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर मालदीव सरकारला स्पष्टीकरण जारी करावे लागले.

...अन् ‘बायकॉट मालदीव’ मोहीम

मालदीवमधील नव्या सरकारमधील नेत्यांनी वादग्रस्त टिप्पणी केल्यावरून चांगलाच वाद पेटला असून मालदीव सरकारने याबाबत अधिकृत भूमिकाही जाहीर केली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका करताना भारत पैसे कमविण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचे म्हटले होते. तसेच मोदींच्या लक्षद्वीप भेटीमुळे मालदीवला मोठा फटका बसणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मालदीवच्या सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानानंतर सोशल मीडियावर मात्र संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी ‘बायकॉट मालदीव’ अशी मोहीम सुरू केली आहे.

Advertisement

.