यापुढे पोलीस बंदोबस्तात राबविणार अतिक्रमण हटाव मोहीम
मनपाच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
खासबागमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर झालेल्या हल्ल्याची महापालिकेने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. यापुढे शहरातील कोणतेही अतिक्रमण हटविण्यासाठी जाताना पोलीस आयुक्त कार्यालयाला पूर्वकल्पना देऊन पोलीस बंदोबस्तातच मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मंगळवारी सकाळी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात श्रेयस नाकाडी यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम स्थायी समितीची बैठक पार पाडली. यावेळी व्यासपीठावर महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली, सत्ताधारी गटनेते संतोष पेडणेकर यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
गेल्या चार दिवसांपूर्वी खासबाग येथे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर काही व्यापाऱ्यांनी हल्ला करून जेसीबीची तोडफोड केली. इतकेच नव्हे तर झोनल आयुक्त अंकित यांच्यावर हल्ला करून धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणला. या घटनेमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर महापालिकेतील सत्ताधारी गट आक्रमक बनला. संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात यावी, यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
त्यानंतर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत काही संशयितांना अटक केली आहे. या घटनेचे पडसाद मंगळवारच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत उमटले. यावर सविस्तर चर्चा होऊन यापुढे शहरातील कोणत्याही ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई करण्यापूर्वी पोलीस आयुक्त आणि संबंधित पोलीस ठाण्याला लेखी स्वरुपात पूर्वकल्पना देण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस बंदोबस्ताशिवाय पथकाने कारवाईसाठी जाऊ नये तसेच विजेच्या खांबांना आणि तारांना धोका असलेल्या ठिकाणी कारवाई करताना हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनाही सोबत घेऊन जावे. जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही.
अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण केले जाते. त्यामुळे दुसऱ्यांदा कारवाई करताना संबंधितांना दंड ठोठावण्यात यावा. ज्या प्रभागांमध्ये अधिकाऱ्यांनी कोणती कामे केली आहेत त्याची माहिती दरमहा स्थायी समिती अध्यक्षांना द्यावी. गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली आदी ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील जवळपास सर्वच उद्याने, तलाव व इतर ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत आहे. न्युक्लियस मॉलसमोर मनमानी पद्धतीने पार्किंग केले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. रामलिंगखिंड गल्लीत मास्टरप्लॅन राबवून देखील त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष दिले पाहिजे. यासह इतर विषयांवर चर्चा झाली. यापुढे अतिक्रमण हटविण्यासाठी जाताना पोलीस बंदोबस्त घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणार असून शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अधिक वेगाने व प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
