डोनाल्ड ट्रम्पविरोधी आवाज बुलंद
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरोधात जनता रस्त्यावर : न्यूयॉर्कपासून लंडन-युरोपपर्यंतही ट्रम्प यांना सत्तेवरून हटवण्याची मागणी तीव्र
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा आणि इराणविरुद्धच्या युद्धाचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘नो किंग्स’ रॅलीसाठी अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये आणि युरोपच्या अनेक भागांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत आंदोलक विविध मुद्यांवर आपला संताप व्यक्त करण्यासाठी एकत्र जमले होते. अमेरिका ते युरोपपर्यंत अनेक देशांतील आंदोलकांनी ‘पुट डाऊन द क्राऊन, क्लॉन’ (मुकुट खाली ठेव, विदूषका) यांसारख्या घोषणा देत ट्रम्प प्रशासनावर टीका केली. सेंट पॉल, मिनेसोटा, कॅपिटल लॉन येथेही हजारो लोक निषेध रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात शनिवारी आयोजित ‘नो किंग्स’ रॅलीमध्ये 80 लाख लोकांनी सहभाग घेतला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ही निदर्शने अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये 3,300 हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मागील ऑक्टोबरमधील आंदोलनांच्या तुलनेत या वर्षीच्या ‘नो किंग्स’ आंदोलनात जवळपास 10 लाख अधिक लोक सहभागी झाले. देशाच्या वेगवेगळ्या भागात जवळपास 600 हून अधिक निषेधफेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. ट्रम्प प्रशासनाच्या अनेक धोरणांवर, विशेषत: इराणसोबतचा वाढता तणाव, कठोर स्थलांतरण अंमलबजावणी आणि वाढत्या महागाईवर जनता संतप्त होती.
अनेक ठिकाणी लोकांनी ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्यावर टीका करणारे आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे फलक प्रदर्शित केले. आतापर्यंत ट्रम्प यांच्या विरोधात तीन राष्ट्रीय आंदोलने झाली आहेत. पहिले मोठे आंदोलन जून 2025 मध्ये, त्यानंतर दुसरे ऑक्टोबर 2025 मध्ये आणि तिसरे 28 मार्च 2026 रोजी झाले. मिनियापोलिस आणि सेंट पॉल, मिनेसोटा येथे अंदाजे 2 लाख लोक रस्त्यावर उतरले होते. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर आणि मॅनहॅटनमध्येही मोठ्या संख्येने लोक जमले होते. येथील प्रचंड गर्दीमुळे पोलिसांना अनेक रस्ते बंद करावे लागले.
अनेक आंदोलकांनी ट्रम्प यांचा फोटो आणि ‘एपस्टीन’ हा शब्द असलेले फलक झळकवले. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाईल्समध्ये ट्रम्प यांचे नाव अनेक वेळा आले आहे. ट्रम्पविरोधी आंदोलन सातत्याने जोर धरत असल्याचे न्यूयॉर्कच्या महापौरांनी जमावाला संबोधित करताना सांगितले. वॉशिंग्टन डी.सी. मध्ये लिंकन मेमोरियल आणि नॅशनल मॉलजवळ जमून लोकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ओरेगॉनमधील पोर्टलँड येथील निदर्शनाला तणावपूर्ण वळण लागले. आंदोलकांनी यू.एस. इमिग्रेशन एजन्सीच्या कार्यालयाबाहेर अमेरिकेचा झेंडा जाळला. अमेरिकेत आंदोलने बहुतांशी शांततापूर्ण राहिली, परंतु लॉस एंजेलिसच्या काही भागांमध्ये परिस्थिती चिघळली. त्याठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. याप्रसंगी अनेकांना अटकही करण्यात आली.
अमेरिकेबाहेरही आंदोलनाचे लोण
ट्रम्प यांच्या विरोधातील संताप केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगाच्या इतर भागांमध्येही दिसून आला आहे. पॅरिस, लंडन आणि लिस्बनसारख्या शहरांमध्ये लोकांनी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. इटलीची राजधानी रोममध्ये ‘नो किंग्स’ आंदोलनादरम्यान, लोकांनी प्रमुख नेत्यांचे पोस्टर हातात घेतले होते. आंदोलकांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने केली. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चा पोशाख घातलेल्या एका महिलेने आंदोलनात भाग घेतला. शिकागोमध्येही हजारो लोक ‘ट्रम्प यांना हटवा’ अशा घोषणा देत रस्त्यावर उतरले. एकंदर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाचे लोण अन्य देशांमध्येही पसरले आहे.
व्हाइट हाऊसकडून मतप्रदर्शन
आंदोलनांचा लोकांवर परिणाम होत नाही, असा दावा करत व्हाइट हाऊसने या आंदोलनांना ‘थेरपी सेशन्स’ म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांचा दावा आहे की त्यांचे निर्णय देश मजबूत करण्याच्या उद्देशाने आहेत. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प प्रशासनावरील नाराजीची कारणे...
- महागाई व इंधन किमती : मध्य-पूर्वेतील युद्ध आणि वाढत्या तेलाच्या किमतींचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम झाला आहे.
- कठोर स्थलांतर धोरणे : फेडरल एजंट्सकडून होणारे छापे आणि हिंसाचारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- इराण युद्ध : इराणविरुद्धच्या युद्धात 13 अमेरिकन सैनिक हुतात्मा झाले आहेत. जनतेतून हे युद्ध थांबवण्याची मागणी होत आहे.