Konkan News : लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह तीघेजण जाळ्यात, ACB ची धडक कारवाई
फेरफार नोंदणीसाठी 30 हजाराची लाच घेताना कारवाई
मंडणगड : तालुक्यातील शेनाळे येथे लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकारी अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसूल अधिकारी (अतिरिक्त कारभार सोवेली सजा) श्रीनिवास श्रीरामे व मंडणगड उपकोषागार कार्यालय येथील शिपाई मारुती भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
27 मे रोजी सांयकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालय आवारात ही कारवाही करण्यात आली. यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातबारा उतारा संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून करून देतो असे सांगून या कामासाठी मारुती भोसले यांनी तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपये रकमेची मागणी केली होती.
तक्रार देण्यापूर्वी यापैकी 45 हजार रुपये मारुती भोसले याने ऑनलाईन स्वीकारले. परंतु ही फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केल्याने तक्रारदार यांनी 27 मे रोजी मंडळ अधिकारी अमित शिगवण, श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले यांच्यासमक्ष भेट घेतली. तेव्हा हा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण याने तक्रारदार यांच्याकडे प्रलंबित काम पूर्ण करून देण्यासाठी 27 मे रोजी पडताळणी दरम्यान 30 हजार रुपये लाच रकमेची मागणी केली.
शिगवण याने तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. स्वीकारलेल्या लाच रकमेतील स्वत:चा हिस्सा 15,500 स्वत:साठी ठेवून उर्वरित 14,500 रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे याला दिला. याप्रकरणी मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व शिपाई मारुती भोसले या तिघांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले.
ही सापळा कारवाई ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, सुहास शिंदे, रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छींद्र जाधव, सहा. पोलीस फौजदार उदय चांदणे, हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल राजेश गावकर, हेमंत पवार, वैशाली धनावडे यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्याच्यावतीने खासगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर नागरिकांनी रत्नागिरी लाचलुचपत विभाग कार्यालयाशी 02352-222893, 7588941247, 9870474535, 7774097874 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.