धर्मांतर विरोधी कायदा आणणार : मुख्यमंत्री
आयेशाप्रकरणावर विधानसभेत लक्षवेधी सूचना : भाडेकरु पडताळणीवरून पोलिसांवर टीका
पणजी : जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर ते रोखण्यासाठी धर्मांतर बंदी कायदा आणला जाईल, कारण आता तशी गरज भासू लागली आहे, असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बोलताना केले. उत्तर प्रदेश पोलिसांनी गोव्यात येऊन अटक केलेल्या आयेशा उर्फ निकी प्रकरणावर आधारित लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडण्यात आली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना डॉ. सावंत बोलत होते. गोवा पोलिस व इतर गुप्तचर यंत्रणांना या प्रकरणाचा सुगावा लागला नाही म्हणून सत्ताधारी, विरोधी आमदारांनी पोलिस निष्क्रिय असल्याचे नमूद केले. हे प्रकरण गंभीर असून त्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यात गुंतलेल्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेत झाली.
सखोल चौकशी करा : प्रेमेंद्र शेट
आमदार प्रेमेंद्र शेट आणि आमदार क्रूझ सिल्वा यांनी सदर आयेशा प्रकरणाशी संबंधित लक्षवेधी सूचना मांडली होती. तिच्यावर चर्चा झाली. प्रेमेंद्र शेट म्हणाले की, हा विषय गंभीर असून तिचा कट्टरपंथी जिहादी रॅकेट तसेच आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसते. परदेशातून कोटींचा पैसा येतोय आणि धर्मांतर करण्याचे धंदेही केले आहेत. हे पोलिस खात्याला कसे कळले नाही, अशी विचारणा शेट यांनी केली तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
पोलिस अपयशी ठरले : क्रूझ सिल्वा
आमदार क्रूझ सिल्वा म्हणाले की, आयेशाची भाडेकरु पडताळणी नीट झाली नाही असे दिसते. गोव्यात मेगा प्रकल्प मोठ्या प्रमाणात वाढले असून तेथे कोण राहातात, ये-जा करतात याचा कोणालाच पत्ता लागत नाही. पोलिस या प्रकरणात साफ अपयशी ठरल्याची टीका सिल्वा यांनी केली.
पोलिसांचे नाक कापले : सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई यांनी काही वर्षांपूर्वीचा चंगूरबाबाचा विषय उपस्थित केला आणि त्यालाही परदेशातून कोट्यावधी रक्कम येत होती व ती धर्मांतरासाठी वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश पोलिस येऊन आयेशाला अटक करतात तोपर्यंत गोवा पोलिस झोपले होते काय? अशी विचारणा सरदेसाई यांनी केली. या प्रकरणात गोवा पोलिसांचे नाक कापले गेल्याची टीका सरदेसाई यांनी केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनीदेखील या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असे सूचवले. वीरेश बोरकर यांनी आयेशाची भाडेकरु तपासणी झाली नसल्याचा संशय वर्तवला किंवा त्यात कोणी गुंतले असल्याची शंका व्यक्त केली.
गोवा पोलिसांमुळेच आयेशाला अटक : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, या प्रकरणाची पोलिस चौकशी चालू आहे. गोवा पोलिसांनी सहकार्य केले म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांनी तिला अटक केली, असे सांगून आतापर्यंत 6600 भाडेकरुंची पडताळणी केल्याची माहिती दिली. आता ती ऑनलाईन सुरू करण्यात आली असून भाडेकरुंची माहिती पोलिसांना न दिल्यास घर मालकास अटक करण्याचा इशारा डॉ. सावंत यांनी दिला आहे. कामगारांची देखील पडताळणी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आयेशाचे पालक गोव्यात राहात होते आणि ती सुट्टीत गोव्यात यायची, असे डॉ. सावंत म्हणाले. चौकशी चालू असल्याने अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.