विरोधकांच्या आघाडीत काँग्रेसविरोधी सूर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याने आता काँग्रेसविरोधात धुसफूस सुरू झाली आहे. जेव्हा काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट संघर्ष असतो, तेव्हा काँग्रेसला जबर फटका सहन करावा लागतो, हे महाराष्ट्राच्या निवडणुकीने पुन्हा सिद्ध केले आहे. काँग्रेसच्या दयनीय कामगिरीमुळे आता विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्या हाती द्यावे, अशी मागणी करून तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या 75 मतदारसंघात यंदा भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष झाला होता. त्यात काँग्रेसला केवळ 10 जागांवर विजय मिळविता आला. या पक्षाला महाराष्ट्रात केवळ 16 जागा मिळविता आल्या. त्यातील 10 जागा या पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मिळविल्या. महाविकास आघाडीचा निर्णायक पराभव होण्यास काँग्रेसची ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील दयनीय कामगिरी कारणीभूत ठरली, असे दिसून येत आहे.
हरियाणातही तेच
दीड महिन्यापूर्वी झालेल्या हरियाणातील विधानसभा निवडणुकांमध्येही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट संघर्ष ज्या जागांवर होता, त्यातील अनेक जागा काँग्रेसने गमावल्या. या दोन्ही पक्षांनी कोणत्याही अन्य मोठ्या प्रादेशिक पक्षाशी युती केली नव्हती. परिणामी, अनेक मतदारसंघात थेट संघर्ष होता. काँग्रेसचा मोठा विजय होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, भारतीय जनता पक्षानेच स्पष्ट बहुमत मिळविले आणि काँग्रेसला सलग तिसऱ्या वेळी सत्तेबाहेर रहावे लागले.
चुका सुधारल्या नाहीत
हरियाणाचा अनुभव लक्षात घेऊन काँग्रेसने महाराष्ट्राच्या निवडणुकीत चुका सुधारणे आवश्यक होते. तथापि, तसे झाले नाही. त्यामुळे पुन्हा दारुण पराभव पदरी पडला. काँग्रेसच्या दयनीय कामगिरीचा फटका तिच्या मित्रपक्षांनाही बसला. त्यामुळे काँग्रेस हे एक ओझे आहे, असा विचार विरोधकांच्या आघाडीत बळावू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत.
तृणमूल काँग्रेसची टीका
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षासमोर काँग्रेस एकास एक लढत असेल तर टिकू शकत नाही, अशी टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सहा पोटनिवडणुकांमध्ये या पक्षाने लीलया बाजी मारली. या पक्षाने तेथे काँग्रेसशी युती केली नव्हती. तसेच झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांच्याशी युती केल्याने काँग्रेसला लाभ झाला असे दिसून येते. म्हणजेच काँग्रेस स्वबळावर भारतीय जनता पक्षाशी दोन हात करण्यास असमर्थ असल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हणणे व्यक्त केले आहे.
ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व द्या
तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याकडे विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व देण्यात यावे, अशी मागणी केल्याने मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांची अद्याप या मागणीवर प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातही पराभव झाल्याने काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे हे मात्र स्पष्ट आहे.