व्यसनविरोधी लोकचळवळ आवश्यक
31 मे तंबाखू विरोधी दिन
31 मे हा दिवस सर्वत्र तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी आरोग्याला हानिकारक असणाऱ्या या तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रसारासाठी उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळ्या शकली लढविल्या आहेत, ज्याचे लोण ग्रामीण भागातही वेगाने पसरलेले आहे. वेगवेगळ्या मोठमोठ्या बक्षिसांची आमिष दाखवून बालवर्गाला भुरळ पडून त्यांना या घातक व्यसनांच्या मायाजालात अडकवले आहे.
सद्य:स्थितीला सर्वात जास्त मृत्यू केवळ तंबाखूमुळेच होतात व त्यातली मनाला दु:ख देणारी गोष्ट म्हणजे ते सर्व टाळण्याजोगे असतात. माणसाचा जीव घेणारे इतर घटक म्हणजे एड्स, प्रदूषण, कोकेन, हेरॉइनसारखे अमली पदार्थ, खून, आग, अपघात, आत्महत्या इत्यादी, या साऱ्या कारणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या एकत्र करूनसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त बळी केवळ तंबाखूचे असतात, हे आज जागतिक आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे. साऱ्या जगात तंबाखूचे सेवन केल्यामुळे दरवर्षी किमान तीस लाख लोक मरण पावतात. म्हणजेच दरमहा सेकंदाला एक मृत्यू तंबाखूमुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. हिरोशी नाकाजीना यांच्या म्हणण्यानुसार वरील मृत्यूपैकी पंधरा लाख मृत्यू भर तारुण्यात होतात. त्यामुळे त्या लोकांच्या कुटुंबाचे अपरिमित नुकसान होते. हे तंबाखू सेवनाचे सत्र अव्याहतपणे असेच वाढत राहिले, तर येत्या काही दशकात तंबाखू सेवनाने होणाऱ्या अकाली मृत्यूची संख्या दरवर्षी एक कोटीच्या वर जाईल, अशी साधारण भीती डब्ल्यूएचओ( वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन )ने व्यक्त केली आहे. म्हणजे त्या वेळी दर तीन सेकंदास एक मृत्यू तंबाखूमुळे होईल. अमेरिकेत दर वर्षी 3,50,000 लोक निव्वळ तंबाखूचे बळी ठरतात. एका अंदाजानुसार भारतात दरवर्षी सर्व प्रकारच्या तंबाखू सेवनामुळे (बिडी, सिगारेट, हुक्का, चुना, तंबाखू, मावा, गुटखा, चिरुत, मिश्री, तपकीर, जाफरानी तंबाखू पेस्ट इत्यादी)होणाऱ्या रोगांनी जवळजवळ दहा लाख लोक मरण पावतात, तर टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या अंदाजानुसार हा आकडा दहा लाखापर्यंत असावा.
आपल्या देशात जवळजवळ आठ लाख लोक तंबाखूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडले, म्हणजेच साधारणपणे दररोज 2200 लोक आपल्या भारतात तंबाखूच्या सेवनाने मरण पावतात. तंबाखू सोडून इतर सर्व आरोग्याच्या समस्यांमुळे तुलनेत कमी लोक दगावतात, तर 2022 च्या आकडेवारीनुसार सतरा लाख लोक तंबाखूच्या सेवनाने दगावले. ही वस्तुस्थिती विस्मयकारक असली तरी सत्य आहे, शिवाय तंबाखू भट्टीमध्ये भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे, परिणामी, प्रदूषणातही नित्य वाढ होत आहे(एक व्यसनी माणूस आपल्या आयुष्यात 530 झाडे तोडतो, 529 तंबाखूसाठी व 1 आपल्या चितेसाठी). धूम्रपान, मावा, गुटखा, जाफरणीचे सेवन, चुना, तंबाखूचा अतिरेक इत्यादींमध्ये वाढ झाली, की पाठोपाठ त्या देशात हृदयविकार व कॅन्सरने मरणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते, हा काही योगायोग नसतो.
तंबाखू उद्योगाचा खप वाढविण्याच्या आक्रमक जाहिरातबाजींचा तो दुर्देवी पण अपरिहार्य असा परिणाम असतो. मग या देशांमध्ये अप्रत्यक्षपणे अन्न, आरोग्यसेवा व इतर आवश्यक गरजांसाठी पैसा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होतात. भारतासारख्या देशातला एखादा गरीब माणूस दिवसाला पाच सिगारेटी, दहा बिड्या व पांच गुटख्याची पाकिटे संपवू लागला तर त्या माणसाच्या मुलांना नेहमीच्या फक्त पाव पटच अन्न मिळू शकते हे साधे गणित आहे.
खरे तर सर्वच तंबाखूजन्य उत्पादनांवर बंदी घातली पाहिजे, तोवर ही व्यसन विरोधी चळवळ चालूच राहील. त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या पाल्यांना व स्वत:लाही या घातक व्यसनापासून दूर ठेवलेच पाहिजे. शिवाय इतरांनाही दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, तरच उद्याचा भारत एक निरोगी आणि सशक्त देश म्हणून आपले अस्तित्व निर्माण करू शकेल. त्यासाठी लोकांनी, लोकांसाठी व्यसनविरोधी लोकचळवळ उभी करायला हवी.
- डॉ. चंद्रकांत शं. कुलकर्णी