अॅन्थ्रोपिकचा येणार आयपीओ गुंतवणुकदारांमध्ये उत्साह
अमेरिकेतील एआय कंपनी : ओपन एआयची स्पर्धक कंपनी
वृत्तसंस्था, टेक्सास
अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये जागतिक पटलावर आघाडीवर असणाऱ्या अॅन्थ्रोपिक कंपनीने आपला आयपीओ आणण्याची तयारी सुरु केली आहे. ही बातमी कळताच गुंतवणुकदारांमध्ये नवचैतन्य पसरलेले पहायला मिळाले.
अॅन्थ्रोपिक ही एआय क्षेत्रातील दिग्गज कंपनी लवकरच शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. कंपनीने अमेरिकेतील नियामक संस्था एसईसी यांच्याकडे आयपीओ संदर्भातला रितसर अर्ज दाखल केला आहे. एआय उद्योगासाठी आयपीओ सादरीकरणासंदर्भातील पाऊल अतिशय महत्त्वाचे ठरणारे असेल. अॅन्थ्रोपिक ही निवडक एआय संबंधीत कंपन्यांपैकी प्रतिष्ठित अशी कंपनी असून गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने विकसित होत आहे.
रक्कम विस्तारासाठी...
कंपनीचे क्लाऊड एआय मॉडेल जगभरामध्ये लोकप्रिय झाले असून ओपन एआयच्या चॅटजीपीटीशी कंपनीची स्पर्धा दिसून येते आहे. आपल्या आगामी विस्तारासाठी आणि नवतंत्रज्ञाच्या अवलंबासाठी कंपनी आयपीओतून उभारलेली रक्कम खर्च करणार असल्याची माहिती मिळते आहे. आयपीओ अंतर्गत किती समभाग सादर केले जातील, त्यांची किंमत काय असेल यासंदर्भातील माहिती मात्र उघड करण्यात आलेली नाही.