अँथ्रोपिकने उभारली 30 अब्ज डॉलर्सची रक्कम
गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे स्पष्ट : 380 अब्ज डॉलर्सवर पोहचणार मूल्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतील आर्टिफिशल इंटीलेजन्स क्षेत्रातील सध्याला चर्चेत असणाऱ्या अँथ्रोपिकने ताज्या निधी उभारणीमध्ये 30 अब्ज डॉलर्सची रक्कम जमाविली आहे. यासह कंपनीचे मूल्य दुप्पटीने वाढून 380 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांचा या कंपनीवर अधिक विश्वास पहायला मिळतो आहे.
याआधी कंपनीने सप्टेंबरमध्ये 13 अब्ज डॉलर्स इतकी रक्कम जमविली होती. त्यावेळी कंपनीचे मूल्य 183 अब्ज डॉलर्स इतके होते. अलीकडच्याच निधी उभारणीच्या मोहीमेमध्ये डी. ई. शॉ वेंचर्स, आयकॉनिक आणि एमजीएक्स सारख्या गुंतवणूकदारांचा मजबूत पाठिंबा कंपनीने प्राप्त केला आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हिडीया यांनीही यापूर्वीच गुंतवणुकीची घोषणा जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चॅट जीपीटी बनविणाऱ्या ओपन एआयचे मूल्य 830 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. सॉफ्ट बँक त्यांच्याशी 30 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करत असल्याचे समजते.
अँथ्रोपिकचा धुमाकुळ
अॅंथ्रोपिक ही क्लाऊड चॅटबॉट हे उत्पादन बनविते. कंपनीने विशेष करुन कोडींगवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. क्लाऊड कोडचे महत्त्व डेव्हलपर्सच्या बाबतीमध्ये पाहता लोकप्रिय होऊ लागले आहे. कंपनीच्या माहितीनुसार क्लाऊडकोडची वर्षाची कमाई 2.5 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच या व्यवसायाचे सबस्क्रिप्शन चारपट वाढले आहे. काही तज्ञांच्या मते त्यांच्या नव्या मॉडेलच्या सादरीकरणामुळे एखादी व्यक्ती जे काम करण्यासाठी 8 तास घेत होती त्याकरीता आता केवळ 30 मिनीटांचाच कालावधी लागू शकतो, असेही नव्या अध्ययनात पुढे आले आहे. या बातमीनेच आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांची धाकधुक वाढली आहे.
आयटी समभाग का घसरले ?
अँथ्रोपिकने आपल्या कोवर्क एआय एजंटसाठी नवीन प्लगइन लाँच केले होते. या घटनेने जागतिक स्तरावरील सॉफ्टवेअर क्षेत्राच्या समभागांवर मोठा परिणाम दिसला होता. गुंतवणूकदारांना वाटले की अँथ्रोपिकचे नवे अॅडव्हान्सड एआय मॉडेल सॉफ्टवेअर कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम करेल, अशी भीती वाटली आहे. याच्याच धक्क्याने गुरूवार आणि शुक्रवारच्या शेअरबाजारातील क्षेत्रात आयटी समभाग मोठ्या प्रमाणात कोसळलेले दिसले होते.