ऐतिहासिक ड्रामा सीरिजमध्ये एंथनी होपकिन्स
प्राइम व्हिडिओकडून होतेय निर्मिती
प्राइम व्हिडिओने नवी हिस्टॉरिकल ड्रामा सीरिज ‘दोज अबाउट टू डाय’ची घोषणा केली असून यात हॉलिवूडचा दिग्गज कलाकार एंथनी होपकिन्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. 10 एपिसोड्सच्या या सीरिजचे दिग्दर्शन रोनाल्ड एमरिच करत आहेत. एमरिच यांना मूनफॉल, इंडिपेडेंस डे आणि गॉडजिला या चित्रपटांसाठी ओळखले जाते.
दोज अबाउट टू डाय या सीरिजची कहाणी याच्या नावाच्या डॅनियल पी. मॅनिक्स यांच्या पुस्तकावर आधारित आहे. कथानक प्राचीन रोमवर आधारित असून प्रेक्षकांना रथांची शर्यत, ग्लॅडियटर्सची लढाई आणि कट पहायला मिळतील. सीरिजचे लेखन रॉबर्ट रोडट यांनी केले आहे. सीरिजमध्ये 79 सालातील रोम दर्शविण्यात येणार आहे.
जगातील सर्वात श्रीमंत शहरात मोठ्या प्रमाणात निर्मितीकार्य सुरू असून यासाठी शहरात मजुरीकरता गुलामांना आणले जात आहे. रोमन जनतेला नियंत्रणात ठेवण्यासाठी मोफत अन्न आणि मनोरंजनची सुविधा दिली जात असते. याकरता चॅरियट रेसिंग आणि ग्लॅडियटर फाइट्स आयोजित असल्याचे सीरिजमध्ये दाखविले जाणार आहे.
एंथनी होपकिन्स सीरिजमध्ये एम्परर वेस्पोसियन ही भूमिका साकारणार आहे. गेम ऑफ थ्रोन्स फेम आयवान रिऑन टेनॅक्स या भूमिकेत असेल. टॉम ह्यूग्स हा टायटस फ्लावियानस आणि सारा मार्टिन्स ही कैला या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे.
ही सीरिज प्राइम व्हिडिओवर 19 जुलै रोजी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आणि भारतात प्रदर्शित होणार आहे. या सीरिजकरता 1169 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समजते. एंथनी होपकिन्स यांनी जगभरात स्वत:च्या अभिनयाद्वारे ओळख निर्माण केली आहे. द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स या चित्रपटासाठी त्यांना अकॅडमी पुरस्कार मिळाला होता.