सिव्हिलमध्ये आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू
रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण : मृत बाळंतीण गोकाकची
प्रतिनिधी/ बेळगाव
आठ दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवार दि. 26 रोजी आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाला आहे. पूजा अडिवेप्पा खडकभावी (वय 25, रा. कुंदरगी ता. गोकाक) असे तिचे नाव असून बाळंतिणीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी प्रसूतीगृह आवारात एकच आक्रोश केला. सातत्याने बाळंतिणींचा आणि नवजात शिशूंचा मृत्यू होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
24 डिसेंबर रोजी पूजाला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी तिने मुलाला जन्म दिला. यापूर्वी तिला तीन मुली असून ही चौथी प्रसूती होती. प्रसूतीदरम्यान तिच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने तिचा गुरुवारी मृत्यू झाला. बाळंतिणीचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रसूती आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या आठ दिवसांपूर्वीही एका बाळंतिणीचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत नातेवाईकांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याने प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूजा आधीच बेशुद्धावस्थेत होती. त्यातच तिचे हृदय व्यवस्थित काम करत नव्हते. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. वसंत कब्बूर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बळ्ळारी येथील बिम्स रुग्णालयात बाळंतिणींच्या साखळी मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असतानाच बेळगाव जिल्हा रुग्णालयातही सातत्याने बाळंतिणी आणि नवजात शिशूंचा मृत्यू होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बिम्स प्रशासनाविरोधात अनेकवेळा आरोप केले जात असले तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.