अशीही एक बँकस्लिप
बँकेतून पेसे काढणे किंवा बँकेत पैसे जमा करण्यासाठी स्लिप भरुन द्यावी लागते, हे बहुतेकांना माहीत आहे. सध्या अशीच एक बँकस्लिप सोशल मिडियावर चर्चेत आहे. खरोखरच अशा प्रकारे स्लिप भरुन देण्यात आली आहे, की केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला आहे, हे स्पष्ट होत नाही. मात्र, खरोखरच अशा प्रकारे ती भरुन देण्यात आली असेल, तर त्या स्लिपवर पुढची प्रक्रिया करताना बँक कर्मचाऱ्याची तारांबळ उडाली असेल हे निश्चित.
या स्लिपवर इतर मजकूर सोडाच, पण दिनांकही योग्य नोंदण्यात आलेला नाही. या स्लिपमध्ये नावाच्या स्थानी ‘सोनूकी मम्मी’ असा उल्लेख आहे. रकमेचा आकडा 22,000 असा आहे पण अक्षरी रकमेच्या जागी ‘कन्या’ असा शब्द आहे. त्यानंतर ‘योग’ अर्थात बेरीज किंवा टोटल या स्थानी ‘राजयोग’ असे लिहिले आहे. तर दिनांक 30 फेब्रुवारी 2025 असा लिहिलेला आहे. फेब्रुवारी महिन्यात कधीही 30 दिवस नसतात हे सर्वांना माहीत आहेच. सोशल मिडियावर या स्लिपचे छायाचित्रही पोस्ट करण्यात आले आहे. अनेकांनी अशी स्लिप बघून आश्चर्य व्यक्त केले असून इतर अनेकांनी हे अविश्वसनीय असल्याची टिप्पणी केली आहे. अशी स्लिप बँक मुळात स्वीकारणारच नाही, असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या स्लिपची सत्यासत्यतेची कोणतीही शाश्वती देता येत नाही. मात्र, ती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे, एवढे निश्चित आहे. तसेच आपल्या देशात एकंदरीतच बँक, न्यायालये आणि इतर कार्यालयांमध्ये काय आणि कसे लिहून द्यायचे असते, याची जाणीव अनेकांना नसते, हेही खरे आहे. त्यामुळे असा काही मजकूर बँक स्लिपवर लिहिला जाणारच नाही, असे कसे म्हणता येईल ?