मॅक्सवेलचे आणखी एक विस्मयकारक शतक
ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय, गायकवाडचे पहिले शतक वाया
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
विश्वचषक स्पर्धेनंतर आणखी एक विस्मयकारक व तडाखेबंद नाबाद शतक नोंदवत सामनावीर ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतावर 5 गड्यांनी एकहाती रोमांचक विजय मिळवून दिला आणि मालिकेत भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. त्याच्या खेळीमुळे ऋतुराज गायकवाडने नोंदवलेले पहिले शतक वाया गेले.
भारताने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 3 बाद 222 धावा फटकावल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 5 बाद 225 धावा जमवित रोमांचक विजय साकार केला. हेडने जोरदार फटकेबाजी करीत 18 चेंडूत 35 धावा तडकावल्या. त्याचा हा जोम नंतर मॅक्सवेलने कायम राखला. ऑस्ट्रेलियाची स्थिती 6.2 षटकांत 3 बाद 68 अशी असताना मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये अफगाणविरुद्ध नोंदवलेल्या नाबाद द्वितकी खेळीसारखी आणखी एक खेळी करीत भारताच्या विजयाचा घास काढून घेतला. त्याने प्रथम स्टोईनिससमवेत 40 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. स्टोईनिस 21 चेंडूत 17 धावा काढून बाद झाल्यानंतर डेव्हिडही शून्यावर बाद झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाला 39 चेंडूत 88 धावांची गरज होती. कर्णधार मॅथ्यू वेडच्या साथीने आवश्यक धावा जमवित मॅक्सवेलने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत विजय साजरा केला. वेडने 16 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार मारत नाबाद 28 धावांसह त्याला पूरक साथ दिली. मॅक्सवेलने 48 चेंडूत 8 चौकार, 8 षटकारांची आतषबाजी करीत नाबाद 104 धावा झोडपल्या. त्याचे हे चौथे टी-20 शतक असून त्याने भारताच्या रोहित शर्माच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारताच्या रवी बिश्नोईने 2, अर्शदीप सिंग, आवेश खान, अक्षर पटेल यांनी एकेक बळी मिळविले तर महागडा ठरलेल्या प्रसिद्ध कृष्णाने 4 षटकांत 68 धावा दिल्या. या मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे 1 डिसेंबर रोजी होणार आहे.
गायकवाडचे शतक
गायकवाडने तुफान फटकेबाजी करीत केवळ 57 चेंडूत नाबाद 123 धावा झोडपल्या. त्याच्या खेळीत 13 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. चौथ्या गड्यासाठी त्याने तिलक वर्मासोबत 141 धावांची भागीदारी केली. त्यात वर्माच्या केवळ 31 धावा होत्या. या जोडीने सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर यांनी नोंदवलेली 119 धावांच्या भागीदारीचा विक्रम मागे टाकला. गायकवाडने मॅक्सवेलने टाकलेल्या शेवटच्या षटकांत तीन षटकार, दोन चौकारांसह एकूण 30 धावा तडकावल्या. त्याचे हे षटक निर्णायक ठरू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये भारतीय फलंदाजाने नोंदवलेले हे पहिलेच शतक आहे.
ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर जादा बाऊन्स व स्विंग असणाऱ्या खेळपट्टीवर भारताची चांगली सुरुवात झाली नाही. आधीच्या सामन्यात तडाखेबंद अर्धशतक नोंदवलेला यशस्वी जैस्वाल केवळ 6 धावा काढून बाद झाल्यानंतर इशान किशनही शून्यावर बाद झाला. यावेळी भारताची स्थिती 3 षटकात 2 बाद 24 अशी झाली होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने गायकवाडला चांगली साथ देत 39 धावा फटकावताना 57 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 29 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 39 धावा फटकावल्या. टी-20 मध्ये पदार्पण करणाऱ्या अॅरोन हार्डीने त्याला उसळत्या चेंडूवर बाद केले.
भारताने प्रतिषटक 8 धावांच्या गतीने धावा जमविल्या. एक बाजू लावून धरण्याचे काम करणाऱ्या उपकर्णधार गायकवाडने आपली भूमिका चोखपणे बजावली. प्रारंभी त्याने 15 चेंडूत 13 धावा अशी संथ सुरुवात केली होती. पण सूर्या बाद झाल्यानंतर त्याने गियर बदलला आणि आपल्या भात्यातील विविध फटक्यांचे प्रदर्शन घडविले. त्याने व्ही मध्ये काही दर्जेदार ड्राईव्ज मारले तर काही फटक्यांनी त्याने आपली ताकद दाखवून दिली. पुल आणि इनसाईड आऊट षटकारांनी त्याने आपली खेळी सजवली. शेवटच्या सहा षटकात त्याचा रुद्रावतार दिसून आला. 32 चेंडूत 50 धावा केल्यानंतर त्याने तुफानी फटकेबाजी सुरू केली आणि आणखी 20 चेंडूतच त्याने शतकी मजल मारली. मॅक्सवेलच्या शेवटच्या षटकात त्याने लाँगऑनच्या दिशेने षटकार ठोकून 52 चेंडूत शतक पूर्ण केले. या षटकात त्याने आणखी दोन षटकार ठोकले. तिलक वर्मानेही 24 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा फटकावल्या. भारताने सलग तिसऱ्या सामन्यात द्विशतकी मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांत हार्डी सर्वात महागडा ठरला. त्याने 64 धावा देत एक बळी मिळविला तर रिचर्डसनने एका बळीसाठी 34 धावा मोजल्या. बेहरेनडॉर्फने मात्र भेदक मारा करीत 4 षटकात केवळ 12 धावा देत जैस्वालचा बळी मिळविला. त्यापैकी एक षटक निर्धाव होते.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 3 बाद 222 : जैस्वा 6 चेंडूत 6, गायकवाड नाबाद 123 (57 चेंडूत 13 चौकार, 7 षटकार), इशान किशन 0, सूर्यकुमार यादव 39 (29 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), तिलक वर्मा नाबाद 31 (24 चेंडूत 4 चौकार), अवांतर 23 (18 वाईड). गोलंदाजी : बेहरेनडॉर्फ 1-12, रिचर्डसन 1-34, हार्डी 1-64, एलिस 0-36. सांघा 0-42.
ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 5 बाद 225 : हेड 35 (18 चेंडूत 8 चौकार), हार्डी 12 चेंडूत 16, इंग्लिस 6 चेंडूत 10, मॅक्सवेल नाबाद 104 (48 चेंडूत 8 चौकार, 8 षटकार), स्टोईनिस 21 चेंडूत 17, डेव्हिड 0, वेड नाबाद 28 (16 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), अवांतर 15. गोलंदाजी : बिश्नोई 2-32, अर्शदीप 1-44, आवेश खान 1-37, अक्षर पटेल 1-37, कृष्णा 0-68.