For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इंडिया’कडून पुन्हा शक्तिप्रदर्शन

06:09 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इंडिया’कडून पुन्हा शक्तिप्रदर्शन
Advertisement

सुनीता केजरीवालांपासून अखिलेश-तेजस्वींसह विरोधक भाजपवर बरसले : रांची येथे जाहीर सभा

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडची राजधानी रांची येथे रविवारी विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ने एकजुटता दाखविली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात रांची येथे जाहीरसभा आयोजित झाली असून याच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या आघाडीने एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले आहे. या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी संबोधित केले आहे. अरविंद केजरीवालांना सत्तेची लालसा नाही, ते केवळ देशाची सेवा करू इच्छितात. देशाला सर्वोत्तम स्थान मिळवून देण्याची त्यांची इच्छा आहे. ‘जेल के ताले टूटेंगे, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन छूटेंगे’ अशी घोषणा देखील सुनीता केजरीवाल यांनी यावेळी दिली. या सभेला 28 पक्षांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा विरोधी पक्षांच्या आघाडीकडून करण्यात आला आहे. तर सभेदरम्यान व्यासपीठावर दोन खुर्च्या रिकामी ठेवत अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला.

Advertisement

केजरीवाल हे मधुमेहाने ग्रस्त असून मागील 12 वर्षांपासून प्रतिदिन 50 युनिट इन्सुलिन घेत आहेत, परंतु तुरुंगात त्यांना इन्सुलिन देणे टाळले जात आहे. भाजप दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा जीव घेऊ पाहत आहे, परंतु केजरीवाल हे अत्यंत शूर आहेत, त्यांना तुरुंगातही ‘भारत माते’ची चिंता असल्याचे उद्गार सुनीता केजरीवाल यांनी काढले आहेत.

कल्पना सोरेन यांनी वाचला संदेश

सभेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांनी त्यांचा संदेश वाचला आहे. भाजप विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमधील सरकार पाडविण्याचे काम करत आहे. परंतु आम्ही लोकशाहीवरील हा हल्ला रोखू. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माझे पती हेमंत सोरेन यांना निवडणुकीपूर्वी भाजपने तुरुंगात डांबले आहे. विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी ईडी आणि सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, परंतु भाजप आणि अशा शक्तींना झारखंडबाहेर हाकलू. भाजप पुन्हा विजयी झाला तर आदिवासींसाठी हा अत्यंत मोठा धोका ठरणार असल्याचा दावा कल्पना सोरेन यांनी केला.

आघाडीची शक्ती मजबूत

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप 500, 400 जागा जिंकू असे म्हणत आहे, परंतु यावेळी आघाडीची ‘शक्ती’ अत्यंत मजबूत असल्याने पंतप्रधान मोदी असो किंवा भाजपचा अन्य कुणी नेता आमचा निर्धार मोडू शकत नाही. भाजप आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका खर्गे यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रकृती बिघडल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत.

‘इंडिया’ भारतासाठी काम करणार

इंडिया आघाडी भारतासाठी काम करणार आहे. तर पंतप्रधान मोदी हे अदानीसाठी काम करतील. भाजपने बंगालमध्ये 400 पार, 200 पार, दिल्लीत 35 पार, झारखंडमध्ये 65 पार अशाप्रकारच्या घोषणा देत लोकांची दिशाभूल केली आहे. 400 पारचा नारा बनावट आहे. यावेळी भाजप तडीपार असे बोलले जावे. यावेळच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करू आणि देशाच्या घटनेला बदलण्यापासून रोखू असा दावा आप खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

तेजस्वींकडून पंतप्रधान लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ देशात गरिबी, महागाई वाढविली आणि जुमलेबाजी केली आहे. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ असे मोदींनी 2014 साली म्हटले होते, हा रोजगार कुठे गेला, काळा पैसा परत आणला गेला का? लोकांच्या खात्यात पैसे आले नाहीत, परंतु भाजपच्या खात्यात इलेक्टोरल बाँडद्वारे हजारो कोटी रुपये आले असल्याची टीका राजद नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे.

भाजपला पराभवाची कल्पना : अखिलेश

उलगुलान न्याय महारॅलीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठविल्यापासूनच भाजपचा पराभव निश्चित झाला आहे. मैदानात जेव्हा पैलवान पराभूत होऊ लागतो, तेव्हा अनेक प्रकारचे मार्ग अवलंबू लागतो. भाजपने येथील सिंहाला अटक केली आहे, परंतु त्याचा आवाज भाजपला दडपता आला नाही, असे अखिलेश यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षांच्या सभेत गोंधळ

विरोधी पक्षांच्या सभास्थळी दोन गटांमध्ये झटापट झाली. दोन्ही गटांनी परस्परांवर खुर्च्या फेकल्या आहेत. या झटापटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या झटापटीमागील कारण मात्र समोर आलेले नाही. राजद आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना मारहाण केल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून प्रत्युत्त

याचदरम्यान भाजपने विरोधी पक्षांच्या आघाडीच्या सभेला ‘ग्रेट फॅमिली गेट टुगेदर शो’ संबोधिले आहे. ही आघाडी म्हणजे स्वत:च्या परिवारांचा विकास इच्छिणाऱ्या पक्षांचा समूह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला घाबरून विरोधी पक्षांचे नेते एका व्यासपीठावर आल्याची टीका भाजपने केली आहे.

Advertisement

.