चीनकडून पुन्हा कुरापत
लडाख सीमेवर शांतता प्रस्थापित होते न होते तोच, चीनचे अरुणाचल प्रदेशलगतच्या सीमेवर आपले ‘खायचे दात’ दाखवावयास प्रारंभ केल्याचे वृत्त आहे. भारतानेही तोडीस तोड सज्जता दाखविल्याने चिंतेचे कारण नसले, तरी चीनसारख्या देशाशी व्यवहार करताना सावधपणा हा नेहमीच बाळगावा लागेल.
अरुणाचल प्रदेशातील भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या बरीच हालचाल होत आहे. भारतीय सैनिक आणि चीनी सैनिक काही स्थानी एकमेकांसमोर आल्याची वृत्ते आहेत. अद्याप ते एकमेकांना भिडल्याची किंवा प्रत्यक्ष चकमक उडाल्याची स्थिती नाही. तथापि, काहीसा तणाव निर्माण झाला आहे. नियंत्रण रेषेच्या जवळ चीनच्या भागात चीनने नवे तंबू ठोकले असून भारतानेही त्याला आपल्या भागातून प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जाते. सीमेचे संरक्षण करणाऱ्या ‘इंडो तिबेटियन सीमासुरक्षा दला’चे प्रमुख शत्रुजित कपूर यांनीही या वृत्तांना दुजोरा दिला आहे. वास्तविक ही स्थिती नवी नसून अनेक दशकांपूर्वीपासूनची आहे. सध्याच्या काळात जुलै 2026 पासूनच या घटना घडत आहेत. अरुणाचल प्रदेश हा पूर्णपणे भारताचा प्रदेश असूनही चीनने त्यावर अनेक दशकांपूर्वीच आपले स्वामित्व असल्याची दर्पोक्ती केली होती. 1962 च्या युद्धात चीनचे सैनिक अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात बरेच आत घुसलेही होते. त्यावेळी जागतिक शांततेची स्वप्ने पाहण्यात भारताचे त्यावेळचे नेतृत्व गुंतले असल्याने सीमांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. त्याचा लाभ उठवून चीनने आगळीक केली होती. नंतर अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा इशारा दिल्याने युद्ध थांबले आणि चीनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मागे गेले. त्या काळात या प्रदेशाला नेफा (नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एरिया) असे संबोधत असत. 1962 च्या युद्धापासून आणि त्याच्याही पूर्वीपासून चीनने नेहमीच लडाख आणि अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये सातत्याने कुरापती काढून भारताचा भाग आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2020 मध्ये लडाखमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. तो जवळपास 3 वर्षे होत होता. आता तेथे बऱ्यापैकी शांतता असताना चीनने नवी आघाडी उघडण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतानेही आपल्या भूभागाच्या संरक्षणासाठी सीमाभागात अधिक सुरक्षा व्यवस्था केली असून अरुणाचल प्रदेश सीमेवर ‘शौर्य कमांडो’ दलाचे अधिक प्रशिक्षित सैनिक नियुक्त केले आहेत. ते चीनी सैनिकांना तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. या घडामोडींना अद्याप सशस्त्र संघर्ष असे नाव देता येत नसले, तरी भारताला सावध राहण्याची आवश्यकता निश्चितच आहे. या घडामोडी केवळ भारत-चीन सीमेपुरत्या मर्यादित नाहीत. भारताच्या पूर्वेला असणारा बांगलादेश सध्या चीनशी चुंबाचुंबी करीत आहे. चीन आणि बांगलादेश यांच्यामध्ये भारताची 42 किलोमीटर लांबीची चिंचोळी पट्टी आहे, जी ऊर्वरित भारताला ईशान्य भारताशी जोडते. या चिंचोळ्या पट्टीचे चीनपासून संरक्षण करणे हे भारतासमोरचे आव्हान नेहमीच असते. बांगलादेशमध्ये धर्मांध शक्तींनी सत्तापालट केल्यानंतर त्या देशाचे प्रमुखत्व स्वीकारलेले मोहम्मद युनुस यांनी ही पट्टी ताब्यात घेण्याचे आवाहन चीनला केले होते. अशा प्रकारे ईशान्य भारत भारतापासून तोडण्याचे त्यांचे कारस्थान होते. तथापि, भारताने या पट्टीत भक्कम सुरक्षा व्यवस्था ठेवल्याने चीन किंवा बांगलादेश यांची डाळ शिजू शकत नाही. अरुणाचल प्रदेश सीमेवर सध्या जी स्थिती आहे, तिचा संबंध या घडामोडींशीही आहे. अशा गुंतागुंतीच्या स्थितीमुळे भारताने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट केली आहे. त्यामुळे फारसा धोका नसला, तरी चीनची मनीषा काही सरळ नाही, हे निश्चित आहे. अर्थात, सरळ धोरणासाठी चीन कधीच प्रसिद्ध नव्हता. पण त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवण्याची गंभीर चूक भारताच्या पहिल्या सरकारने 1947 ते 1962 या काळात नेहमीच केली होती. तिचे परिणाम भारताला आजवर भोगावे लागत आहेत, हे वारंवार दिसून येते. जुन्या घटना उगाळून काय उपयोग? असा शहाजोग उपदेशात्मक प्रश्न या संदर्भात काही विद्वानांकडून विचारला जातो. तरी त्या जुन्या घटनांचे परिणाम आजही होत असल्याने त्या विसरल्या जाऊ शकत नाहीत, हेही तितकेच खरे आणि स्वाभाविक आहे. काही काळापूर्वी भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत, असे बोलले जात होते. ते खरोखरच सुधारणार असतील, तर ते भारताला हवेच आहे. कारण भारताची धारणा संघर्षाच्या विरुद्ध आहे. तथापि, चीनच्या कथनी आणि करणीत नेहमीच अंतर असते. त्यामुळे भारत चीनशी चर्चा करतानाही आपल्या संरक्षणासाठी पुरेपूर दक्ष असतो. हीच दक्षता नेहमी ठेवावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या बारा वर्षांमध्ये ईशान्य भारतात मार्गांचे जाळे निर्माण करुन सैन्याच्या हालचाली वेगाने होण्याची व्यवस्था केली आहे. या सरकारच्या पूर्वीच्या काळात तेव्हढेही भान कोणत्याही सरकारने राखले नव्हते. या पायाभूत सुविधा विकास आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे चीनच्या कोणत्याही दु:साहसाला प्रत्युत्तर देण्यास भारत तोडीस तोड सज्ज आहे. अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात युद्ध विमाने उतरविण्याचीही व्यवस्था करण्यात आली असून क्षेपणास्त्र यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती मिळते. यामुळे फारशी चिंता करण्याचे कारण नसले, तरी सावधपणा हवा हे निश्चित आहे.
