अमेरिकेत आणखी एक विमान दुर्घटना, 6 ठार
उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात विमान अपघातग्रस्त, फिलाडेल्फीयाच्या रहिवासी भागात कोसळले विमान
वृत्तसंस्था/ वॉशिग्टन डीसी
अमेरिकेतील पेसिल्वेनिया राज्यातील फिलाडेल्फीया येथे आणखी एक विमान अपघात झाला आहे. या दुर्घटनेतील या छोट्या विमानातील सर्व सहाजण ठार झाल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिलाडेल्फियातील रुजवेल्ट विमानतळानजिक ही दुर्घटना झाली. विमान रहिवासी भागात कोसळल्याने एका घराला तसेच अनेक कारला आग लागल्याचे सांगण्यात आले. यावेळी पाऊस सुरु असल्याने दृष्यमानता कमी असल्याने ही घटना झाल्याचे सांगण्यात आले.
दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेची राजधानी वॉशिग्टन डीसी येथे एक लष्करी हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान यांची जोरदार टक्कर झाली होती. त्या अपघातामध्ये 67 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या 48 तासात हा दुसरा विमान अपघातात झाल्याने विमान प्रवाशांमध्ये आणि कंपन्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेनेल्वियाचे गर्व्हनर यांनी या दुर्घटनेची माहिती देताना सांगितले, अपघातग्रस्त विमान छोटे आणि लियरजेट प्रकारातील होते. विमानातून एअर अॅम्बुलेन्स स्वरुपात मेडिकल सुविधा देण्यात येत होती. तथापि उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदामध्येच ते रडारवरुन गायब झाले आणि विमानाला अचानक आग लागली व उत्तर पूर्व फिलाडेल्फियाच्या रहिवासी भागात ते कोसळले. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर काही घरांना आग लागल्याचे वृत्त आहे.
फिलाडेल्फियाच्या आपत्ती निवारण कक्षाने या अपघाताची माहिती एक्स माध्यमावर दिली आहे. या परिसरामध्ये ढगाळ वातावरण तसेच धुके होते. 30 सेकंदात हे विमान रडारवरुन नाहिसे झाले आणि दुर्घटनाग्रस्त झाले. या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.