पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आणखी एक हत्याकांड
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे काहीवेळा एखादा खून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद होतो. आणि मग एक खून पचल्यानंतर पिसाळलेल्या गुन्हेगारांकडून खुनांची मालिका सुरु होते. त्याची परिणती हत्याकांडात होते. 20 वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या नांदोस हत्याकांडावेळी या गोष्टीचा पुरेपूर प्रत्यय पोलिसांना आला होता. पण अशा भयानक हत्याकांडांमधून पोलिसांनी अद्याप नीट बोध घेतलेला दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात जयगड तालुक्यातील ‘वाटद खंडाळा तिहेरी हत्याकांडा’च्या निमित्तानं पोलीस तपासातील असाच काहीसा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
‘वाटद खंडाळा तिहेरी हत्याकांड’ प्रकरणात तपासकामात हलगर्जी दाखवल्याबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आतापर्यंत एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली नियंत्रण कक्षात केली आहे तर एका हवालदारावर निलंबनाची कारवाई झाली आहे. अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे. खरेतर, आपल्या विभागातील संशयास्पद मृत्यू आणि बेपत्ता प्रकरणाचा पोलिसांनी नीट तपास केला असता तर कदाचित एक-दोन जीव नक्कीच वाचले असते. पण तसे काही झाले नाही आणि आज संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची वेळ पोलीस अधीक्षकांवर आली आहे.
20 वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील नांदोस हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हत्याकांडात पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एक, दोन नव्हे तर तब्बल दहा जणांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील पहिला बळी ‘बेवारस व्यक्तीचा पाण्यात बुडून आकस्मिक मृत्यू’ म्हणून पोलीस डायरीत नोंद झाला होता. मात्र तो आकस्मिक मृत्यू नसून खून होता. साळेल-नांगरभाट येथील तलावात संबंधित व्यक्तीला बुडवून मारण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी त्याकडे संशयाने न पाहता तो अनोळखी मृतदेह त्याच ठिकाणी ख•ा खणून पुरून टाकला. पण जेव्हा नांदोस हत्याकांडाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलिसांना मृतदेहाचा सांगाडा तपासासाठी उकरून काढावा लागला. जर सुरुवातीलाच पोलिसांनी आपले सोर्स आणि अनुभवाच्या जोरावर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित पुढे नांदोस हत्याकांड घडले नसते, अशा प्रतिक्रिया त्यावेळी सर्वत्र उमटल्या होत्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड पोलीस ठाणे हद्दीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणातही अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटल्यानंतर संबंधित पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर ‘जर-तर’ला काही महत्त्व नसते. पण झालेल्या चुका परत होता नयेत, याचा बोध आपण घ्यायचा असतो. पण तशी खबरदारी पोलिसांकडून घेतली जात नसल्याचे जयगड हत्याकांड प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी बेपत्ता राकेश जंगम बेपत्ता प्रकरणाचा सखोल तपास केला असता तर भक्ती मयेकरचा जीव वाचला असता. तसेच पोलिसांचे नेटवर्क स्ट्राँग असते तर सीताराम वीर याचा मृत्यू मारहाणीतून झालाय ही बाब उघड होऊ शकली असती. पण पोलिसांना सीतारामच्या संशयास्पद मृत्यूचा काहीच मागमूस लागला नाही आणि पुढे दोन हत्या झाल्या. एका खूनाने झालेली सुरुवात पुढे हत्याकांड किंवा सिरियल किलरपर्यंत कशी पोहोचते याचा प्रत्यय पुन्हा एकदा कोकणवासीयांना आला.
एखादा प्रकार किंवा मृत्यू संशयास्पद वाटल्यास त्याचा सखोल तपास करणे, त्याच्या मुळाशी जाऊन शोध घेणे हे पोलिसांचे कर्तव्य असते. पण काहीवेळा पोलिसांकडून कर्तव्यात कसूर होते आणि त्याचे भयानक परिणाम नंतर समोर येतात. ‘कुणाची तक्रार नसेल तर उगाचच कशाला डोक्याला तपासाचा ताप?’ या पोलिसांच्या मानसिकतेमुळे गुन्हेगार बऱ्याचदा मोकाट सुटतात. जयगड हत्याकांड प्रकरण यापैकीच एक उदाहरण आहे.
वाटद खंडाळा तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटील (वय 28) याची प्रेयसी भक्ती मयेकर हिला सीताराम लक्ष्मण वीर (वय 55) हा सातत्याने फोन करून त्रास द्यायचा. याचा राग दुर्वासच्या मनात खदखदत होता. अशातच 29 एप्रिल 2024 रोजी सीताराम दुर्वासच्या सायली बारमध्ये दारु पिण्यासाठी आला होता. सीतारामला पाहताच दुर्वासचा पारा चढला अन् त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने सीतारामला जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. सीतारामचा खून लपवण्यासाठी दुर्वासने सीतारामला रिक्षा करून त्याच्या घरी पाठवल़े सीतारामला दारु पित असताना अचानक चक्कर आली अन् तो बेशुद्ध झाला अशी खोटी माहिती दुर्वासने सीतारामच्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी दुर्वासच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. सीतारामला तपासण्यासाठी घरी आलेल्या डॉक्टरनी तो मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना खबर न देता सीतारामचा अंत्यविधी उरकून घेतला आणि हीच बाब दुर्वासच्या पथ्यावर पडली. मात्र, सीतारामचा मृत्यू आपण केलेल्या मारहाणीतून झालाय ही बाब दुर्वासचे साथीदार विश्वास पवार आणि राकेश जंगम यांना माहिती होती. यापैकी राकेशला दारुचे व्यसन असल्याने तो सीतारामचा खून झाल्याचे कुणाजवळ तरी उघड करेल, याची भीती दुर्वासच्या मनात होती. यातूनच दुर्वासने राकेशचा काटा काढण्याचे ठरवले. हा कट सायली बारमध्ये रचण्यात आला. त्यासाठी 6 जून 2024 ची अमावास्येची रात्र ठरवण्यात आली. यादिवशी दुर्वासने आपल्याला कोल्हापूर येथे जायचे असल्याचे राकेशला सांगितले. ठरल्याप्रमाणे दुर्वासच्या कारमधून राकेश जंगम, नीलेश भिंगार्डे, विश्वास पवार असे चौघे सायंकाळच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघाले. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आंबा घाटात पोहोचताच राकेशचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह आंबा घाटातून खोल दरीत फेकण्यात आला. दरम्यान, राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार 21 जून 2024 रोजी जयगड पोलिसात दाखल करण्यात आली होती. मात्र त्याचा नीट तपास न झाल्याने किंवा त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने सिरियल किलर दुर्वासने पुढे भक्ती मयेकरचा खात्मा करून तिलाही आंबा घाटात फेकून देण्यास मागेपुढे पाहिले नाही. दोन खून पचल्यामुळे त्याला तिसरा खून करताना कशाचीही भीती राहिली नाही. प्रियकर दुर्वासचा दुसऱ्या तरुणीशी विवाह ठरल्याची माहिती भक्तीला मिळाली होती. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाले होते. 16 ऑगस्ट 2025 रोजी मैत्रिणीकडे जाते म्हणून सांगून ती घरातून बाहेर पडली होती. परंतु ती घरी न परतल्याने 21
ऑगस्ट रोजी ती बेपत्ता झाल्याची खबर पोलिसात देण्यात आली. तिचे शेवटचे मोबाईल लोकेशन आणि संभाषण यावरून पोलिसांचा वाटद-खंडाळा येथील दुर्वासवर संशय बळावला आणि त्यांनी दुर्वासच्या मुसक्या आवळल्या. भक्ती लग्नाचा तगादा लावत असल्याने दुर्वासने सायली बार येथे तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह कारमधून रात्रीच्यावेळी आंबा घाटात नेऊन टाकला. यातून हेच स्पष्ट होते की, पोलिसांनी राकेश जंगम बेपत्ताप्रकरणी जर सखोल तपास केला असता तर पहिल्या खुनावर प्रकाश पडला असता अन् नंतर भक्ती मयेकरचा जीव वाचला असता.
या हत्याकांडातून तरुणाईतील मुलींनाही एक संदेश मिळालाय तो म्हणजे, मुलींनीदेखील प्रेमाचे पहिले पाऊल खूप विचाराने टाकले पाहिजे. अलीकडच्या काळात प्रेम प्रकरणातून बळी गेलेल्या मुलींची संख्या वाढती आणि चिंताजनक आहे. प्रेमात धोका मिळालेल्या मुली पश्चातापाच्या आगीत होरपळत मग स्वत:चा जीव गमावून बसतात. हेच सत्य भक्ती मयेकर खून प्रकरणातून समोर आले आहे.
महेंद्र पराडकर