कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानात पुन्हा मोठा हल्ला

06:58 AM Mar 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बलोच आर्मीकडून सुरक्षा दलाचा वाहनताफा लक्ष्य : 90 सैनिकांना मारल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ बलुचिस्तान

Advertisement

पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमधील नोश्की येथे सुरक्षा सैनिकांना घेऊन जाणाऱ्या बसच्या ताफ्यावर रविवारी हल्ला करण्यात आला. बलोच आर्मीने केलेल्या आत्मघाती स्फोटात जवळपास 90 सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या हल्ल्यात केवळ 5 लष्करी अधिकारी हुतात्मा झाल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच 12 सैनिक जखमी झाले. बलोच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तर बलुचिस्तान सरकारने या हल्ल्याचा निषेध केला आहे. बलोच लिबरेशन आर्मीने (बीएलए) रविवारी पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला केल्याचा दावा केला. नोश्की येथील महामार्गावर क्वेट्टाहून कफ्तानला जाणाऱ्या आठ लष्करी वाहनांवर हा हल्ला करण्यात आला. बीएलएच्या मते, त्यांच्या माजीद आणि फतेह ब्रिगेडने लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. सदर बसेसमध्ये सुरक्षा दलाचे जवान होते.

बलुचिस्तानच्या नोश्की जिल्ह्यातील नौश्की-दलबंदिन महामार्गावर एका बसजवळ रस्त्याच्या कडेला बॉम्बचा स्फोट झाला, असे स्थानिक पोलीस प्रमुख जफर जमानानी यांनी सांगितले. स्फोटात जवळच असलेल्या दुसऱ्या बसचेही मोठे नुकसान झाले. मृत आणि जखमींना नोश्की येथील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने लष्कराच्या ताफ्याला धडक दिली. यानंतर, फतेह पथकाने लष्कराच्या ताफ्यात घुसून हल्ला केला. ज्या वाहनावर आत्मघाती हल्ला करण्यात आला ती बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या घटनेनंतर परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

फक्त 5 सैनिक ठार : पाकिस्तान पोलीस

बलुच आर्मीच्या दाव्याच्या विरोधात पाकिस्तानी पोलिसांनीही घटनेबाबत खुलासा केला आहे. बसवरील हल्ल्यात केवळ पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि 10 जण जखमी झाले. मृत आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आल्याचे पाकिस्तानी पोलीस आणि प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शेवटचा दहशतवादी मारला जाईपर्यंत लढा : बलुचिस्तान मुख्यमंत्री

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी सुरक्षा दलावरील हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली आहे. बलुचिस्तानच्या शांततेशी खेळणाऱ्यांचा शेवट खूप वाईट होईल. हे भ्याड हल्ले आपले धैर्य तोडू शकत नाहीत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शांतता राखू. शेवटचा दहशतवादी मारला जाईपर्यंत हे युद्ध सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पाच दिवसांपूर्वी प्रवासी ट्रेनचे अपहरण

पाच दिवसांपूर्वी म्हणजेच 11 मार्च रोजी बीएलएने पाकिस्तानमध्ये एका प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते. क्वेट्टाहून पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस गुडालर आणि पिरू कुनरी या डोंगराळ भागांजवळील एका बोगद्यातून जात असताना बंडखोरांनी अपहरण घडवले. बंडखोरांनी रेल्वे रुळ उडवल्यानंतर ट्रेन थांबताच तिचा ताबा घेतला. नऊ डब्यांच्या या ट्रेनमध्ये 400 हून अधिक प्रवासी होते. यात बीएलएने ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या 214 पाकिस्तानी लष्करी जवानांना ठार मारल्याचा दावा केला होता. तथापि, या प्रकरणात पाकिस्तानी सैन्याने केवळ 28 सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. तसेच सर्व 33 बलोची हल्लेखोरांचा खात्मा केल्याचेही सांगितले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article