रासई स्फोटातील आणखी एका जखमीचा मृत्यू
विजय मरिन शिपयार्डमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागली आग, मृतांचा आकडा चारवर
राय : रासई - लोटली येथील विजय मरिन शिपयार्डमध्ये लागलेल्या आगीत गंभीररित्या जखमी झालेला आणि बांबोळी येथील सरकारी इस्पितळात उपचार घेत असलेला उत्तर प्रदेशातील मनिष चौहान (20) याचे निधन झाले. त्यामुळे या स्फोटात मृत आलेल्यांचा आकडा आता चारवर पोचला आहे. 16 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या स्फोटात आतापर्यंत चारजणांचे बळी गेले आहेत. आणखी तिघेजण जखमींवर उपचार सुरु आहेत. बांधकाम सुरू असलेल्या जहाजात वेल्डिंगच्या कामादरम्यान ही आग लागली होती.
झुआरीनगर येथील रहिवासी आणि मूळ पश्चिम बंगालचे सेर अली, छत्तीसगड येथील विनोद दिवाण आणि संतोष कुमार या तिघांचे यापूर्वी निधन झाले असून गुरुवारी निधन झालेला उत्तर प्रदेशातील मनिष चौहान अशी या स्फोटात दगावलेल्या चौघांची नावे आहेत. अली आणि दिवाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. संतोष कुमार आणि मनिष चौहान यांना बांबोळी येथील सरकारी इस्पितळात मृत्यू आला. सध्या बांबोळी येथील इस्पितळात उपचार घेत असलेल्या जखमी कामगारांमध्ये अभिषेक कुमार (25) आणि मोहम्मद बबलू (27) हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. सुरक्षेतील त्रुटींमुळे थेट स्फोट झाल्याचे मायणा कुडतरी पोलिसस्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक सुरेश वेळीप यांनी तक्रारीत म्हटलेले आहे. सुरक्षा अधिकाऱ्याने सुरक्षा प्रक्रियांचे पालन न करता निष्काळजीपणे काम केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.