For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्धादरम्यान आणखी एका भारतीयाचा मृत्यू

06:11 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्धादरम्यान आणखी एका भारतीयाचा मृत्यू
Advertisement

दुतावासाकडून माहिती : कुवैती वीज प्रकल्पावरील हल्ल्यामुळे तणाव : आतापर्यंत सात भारतीय नागरिक ठार

Advertisement

वृत्तसंस्था/ कुवैत, नवी दिल्ली

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आणखी एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या इराणी हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर प्रकल्पातील एका इमारतीचे मोठे नुकसान झाले, असे कुवैतच्या वीज मंत्रालयाने सोमवारी सांगितले. हा हल्ला कुवैतवरील इराणी आक्रमणाचा एक भाग होता, असे मंत्रालयाच्या प्रवक्त्या फातिमा अब्बास जवाहेर हयात यांनी सांगितले. कुवैतमधील भारतीय दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत सात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बेपत्ता आहे. सोमवारच्या घटनेमुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ झाली असून, भारतीय समुदायामध्ये चिंता वाढली आहे.

Advertisement

कुवैतमध्ये झालेला हल्ला एका सेवा इमारतीला लक्ष्य करून करण्यात आला होता. या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि घटनास्थळावरील इमारतीचे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. भारतीय दुतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात शोकसंवेदना व्यक्त केली. पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत देण्यासाठी ते कुवैती अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबूधाबी येथे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रोखण्याच्या कारवाईदरम्यान झालेल्या ढिगाऱ्याखाली चिरडून एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतरच ही घटना घडली आहे.

Advertisement
Tags :

.