आणखी एका हिंदूला बांगलादेशात जिवंत जाळले
गेल्या 40 दिवसांत 10 हिंदूंची हत्या
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या नरसिंदी जिह्यात एका हिंदू तरुणाला जिवंत जाळल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय चंचल चंद्र भौमिकचा जळालेला मृतदेह एका दुकानात आढळला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी चंचल गॅरेजवजा दुकानामध्ये झोपला होता. कोणीतरी बाहेरून शटरवर पेट्रोल ओतून दुकानाला आग लावली. ही आग आत वेगाने पसरल्यामुळे चंचलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या नव्या प्रकरणामुळे बांगलादेशात गेल्या 40 दिवसांत दहा हिंदूंची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुटुंबाने ही पूर्वनियोजित हत्या असल्याचे म्हटले आहे. ही घटना नरसिंदी शहरातील पोलीस लाईन्सला लागून असलेल्या मस्जिद मार्केट परिसरात घडली. चंचलचा मृतदेह तो काम करत असलेल्या गॅरेजमध्ये आढळला. पोलिसांनी तपास सुरू केला केला असून सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जात आहे. यापूर्वी, 18 डिसेंबर 2025 रोजी, मैमनसिंग जिह्यात एका हिंदू तरुणाला जमावाने मारहाण करून ठार मारले होते. त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळण्यात आला होता.
चंचल दुकानात झोपला असताना अज्ञात हल्लेखोरांनी बाहेरून शटरवर पेट्रोल ओतले आणि नंतर आग लावली. आग वेगाने पसरली. चंचल बंदिस्त शटरच्या आतमध्ये अडकला. तो मदतीसाठी ओरडत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. परंतु त्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही. लोकांनी ही घटना हृदयद्रावक असल्याचे वर्णन केले. अग्निशमन दल स्थानिक सतर्कतेवर पोहोचले आणि आग विझवण्यासाठी सुमारे एक तास लागला. पण चंचलचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत स्थानिक दुकानदार राजीव सरकार यांनी हा अपघात नसून जाणुनबुजून घडवलेली हत्या असल्याचे म्हटले आहे. कॅमेऱ्यात अनेक लोक जाणूनबुजून शटर पेटवताना दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
