सीपीआरमध्ये ‘जीबीएस’चा आणखी एक रुग्ण दाखल
कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय (सीपीआर) मध्ये शुक्रवारी गिलेन बारे सिंड्रोम (जीबीएस) आजाराची लागण झालेल्या 10 वर्षीय बालकाला दाखल करण्यात आले आहे. बेळगाव जिह्यातील कारदगा येथील बालक आहे. त्याला जीबीएसची लक्षणे जाणवू लागल्याने शुक्रवारी दुपारी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सीपीआरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी सांगितले.
सध्या, सीपीआरमध्ये जीबेएसचे उपचार घेण्याऱ्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. आत्तापर्यंत दाखल झालेल्या रूग्णांमध्ये 10 ते 11 वर्षांच्या तीन बालकांचा समावेश असल्याने लहान मुलांना याची लागण होत असल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी सीपीआरमध्ये दाखल केलेला बालक बेळगाव जिल्ह्यातील असला तरी त्याची नोंद सीपीआरमध्ये झाली आहे. दाखल केलेल्या बालकाला गेल्या चार दिवसापासून पायातील ताकत कमी झाल्याने एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्रास वाढतच होता. अखेर नातेवाईकांती त्याला शुक्रवारी सीपीआरमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्याची अधिक तपासणी केली असता त्याला जीबीएस झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्याच्यावर ‘इमिनोग्लोबलिन’ उपचार सुरू केले असुन त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- गुरूवारी दाखल केलेल्या बालकाची प्रकृती स्थिर
गुरूवार दि.30 रोजी रात्री उशिरा 11 वर्षीय बालकाला सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्याला जीबीएसचे निदान झाले होते. त्याच्यावर उपचार सुरू असुन प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. मिरगुंडे यांनी सांगितले.