For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द्रुतगती महामार्गावर पुन्हा गॅस टँकरचा अपघात

06:31 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
द्रुतगती महामार्गावर पुन्हा  गॅस टँकरचा अपघात
Advertisement

 21 टन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचे ब्रेक फेल, मोठा अनर्थ टळला

Advertisement

प्रतिनिधी/ लोणावळा

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील अमृतांजन पूल परिसरात कोचीहून गुजरातकडे 21 टन क्षमतेचा प्रोपिलीन गॅस वाहून नेणारा टँकरचे सकाळी सुमारे 10.00 वाजता बोरघाटातील तीव्र उतारावर ब्र्रेक अचानक निकामी झाल्याने अपघात झाला.  धोकादायक वळणे आणि खोल दरी असल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची भीती निर्माण झाली असताना चालकाने प्रसंगावधान राखत टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या आरसीसी रिटेनिंग वॉलला जाणीवपूर्वक धडकवल्याने टँकर जागीच थांबला आणि संभाव्य स्फोट अथवा गॅसगळतीसारखी गंभीर दुर्घटना टळली. या धाडसी निर्णयामुळे मोठी जीवितहानी आणि पर्यावरणीय नुकसान होण्यापासून बचाव झाला.

Advertisement

अपघातग्रस्त ट्रक कोचीहून गुजरातच्या दिशेने निघाला होता. त्यात 21 टन क्षमतेचा प्रोपिलीन गॅस वायू होता. सकाळी अकराला खंडाळा बोरघाट येथे ट्रक आला असताना गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाचे लक्षात आले. त्यामुळे प्रसंगावधान राखत त्याने टँकर रस्त्याच्या कडेला घेतला व तो थांबविण्यासाठी आरसीसी रिटेनिंग वॉलला धडक दिली. सुदैवाने त्यामुळे कोणतीही गळती किंवा स्फोट झाला नाही. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट, आयआरबीची पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणेची अग्निशमन दल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तसेच हेल्प फाउंडेशनची आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली. हेल्प फाउंडेशनचे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी टँकरची तांत्रिक स्थिती, अंतर्गत दाब आणि गळतीचा संभाव्य धोका यांची बारकाईने तपासणी केली. सुदैवाने कोणतीही गॅसगळती आढळून आली नाही.

 दोन किलोमीटर अंतरावर हलविण्यात आला टँकर

व्रेन आणि पुलरच्या सहाय्याने टँकर अपघातस्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मोकळ्या जागेत सुरक्षितपणे हलविण्यात आला. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि महामार्ग वाहतूक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. आरटीओ अधिकारी रावते यांनी वाहनाची तांत्रिक तपासणी केली असून, खोपोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, टँकर ओढणारे वाहन पूर्णत: निकामी झाले असून, दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने टँकर पुढील प्रवासासाठी गुजरातकडे रवाना करण्यात येणार आहे.

सलग दुर्घटनांमुळे चिंता वाढली

अलीकडच्या काही दिवसांत प्रोपिलीन गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सलग दुर्घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. बोरघाटासारख्या तीव्र उताराच्या घाटरस्त्यावर ब्र्रेक फेल झाल्यास भीषण स्फोट, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि पर्यावरणीय हानी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर धोकादायक रसायने वाहून नेणाऱ्या वाहनांची कडक तपासणी, नियमित फिटनेस चाचण्या, चालकांचे विशेष प्रशिक्षण आणि संबंधित कंपन्यांनी अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Advertisement
Tags :

.