Kolhapur News : कोल्हापूर - हैदराबाद मार्गावर आणखी एक विमानसेवा होणार सुरू
हिवाळी सत्रातील ही विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार
कोल्हापूर : कोल्हापूर ते हैदराबाद मार्गावर आणखी एक नवीन विमानसेवा सुरू होत आहे. या विमानाने हैदराबाद मार्गे अन्य २५ महत्त्वाच्या शहरांमध्ये पोहोचता येणार आहे.
इंडिगो कंपनीतर्फे कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर नवीन विमानसेवा सुरु करण्यात येत आहे.ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या चार दिवशी असणार आहे. हे विमान सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी हैदराबाद विमानतळावरून उडाण करेल व सकाळी ८ वाजून १५ मिनिटांना कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. हे विमान कोल्हापूरहून हैदराबादला ८ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण भरेल.
भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे नियमित उड्डाणास सर्वोतोपरी योजना आणि सेवा देण्यात येईल. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतील कोल्हापूर विमानतळावरुन विमानसेवा वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक अतिरिक्त विमानसेवा सुरू होत आहे. नेहमीच्या हैदराबाद आणि बंगळूर येथे ऑपरेट होत असलेल्या इंडिगो एअरलाइनच्या फेऱ्यांमध्ये पाच दहा मिनिटांचा फरक असेल. हिवाळी सत्रातील ही विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.