For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाकुंभमेळ्यात पुन्हा आगीची दुर्घटना

07:00 AM Jan 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाकुंभमेळ्यात पुन्हा आगीची दुर्घटना
Advertisement

सेक्टर-22 मधील 15 तंबू जळून खाक : सुदैवाने जीवितहानी टळली

Advertisement

वृत्तसंस्था/प्रयागराज

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आगीच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सेक्टर-22 मध्ये अचानक लागलेल्या आगीत काही मिनिटांतच अनेक मंडप जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे आग वेळेत आटोक्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे कोणीही भीती किंवा अफवा पसरवण्याचे प्रयत्न करू नयेत असे सांगत प्रशासनाने भाविकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आगीच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग इतक्या वेगाने पसरली की 15 तंबू पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले,

Advertisement

परंतु परिसरात थेट मार्ग नसल्याने तेथे पोहोचण्यास अडचणी आल्या. तरीही अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यामुळे आग इतरत्र पसरण्यापूर्वी विझविण्यात आली. महाकुंभात अशा प्रकारची जाळपोळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 19 जानेवारी रोजी सेक्टर-19 मध्ये लागलेल्या आगीमुळे 18 छावण्या जळून खाक झाल्या होत्या. तथापि, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कोणीही जखमी झाले नाही. तसेच काही दिवसांपूर्वी सेक्टर-2 मध्ये दोन कारना आग लागल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रसंगीही अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे परिस्थिती आणखी बिकट होण्यापासून रोखली गेली.

प्रशासनाचे आवाहन

महाकुंभसारख्या मोठ्या कार्यक्रमात वारंवार होण्राया आगीच्या घटना चिंतेचा विषय बनत आहेत. हे लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. भाविक आणि छावणी संचालकांना अग्निसुरक्षेचे उपाय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: लोकांना उघड्यावर चुली जाळणे किंवा असुरक्षित विद्युत कनेक्शन वापरणे टाळण्यास सांगण्यात आले आहे. अशा घटनांवर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला अधिक सतर्क केले जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.