महायुतीत पुन्हा खदखद
राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतील दोन जिल्ह्यांबाबतच्या निर्णयाला अवघ्या 24 तासांमध्ये स्थगिती देण्यात आली. यामध्ये रायगड आणि नाशिक जिह्याचा समावेश आहे. रायगडच्या पालकमंत्री पदी आदिती तटकरे तर नाशिक जिह्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, महायुतीमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्री पदावऊन नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गाव गाठले असून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे हे शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी दरे गावी जाणार आहेत.
राज्यात भाजपप्रणीत सरकार स्थापन झाल्यापासून भाजपला विरोधकांपेक्षा मित्रपक्षांचाच अधिक सामना करावा लागत आहे. सरकार स्थापन करत असताना सुरु झालेले नाराजीनाट्या अद्यापही कायम आहे. पालकमंत्र्यांच्या यादीतील दोन जिह्यांबाबतच्या निर्णयाला अवघ्या 24 तासांमध्ये स्थगिती देण्यात आली. यामध्ये रायगड आणि नाशिक जिह्याचा समावेश आहे. रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना तर नाशिकचे पालकमंत्री पद दादा भुसे यांना मिळावे, अशी शिवसेनेची इच्छा असताना रायगडचे पालकमंत्रीपद पुन्हा आदिती तटकरे यांना दिले आहे, तर नाशिकचे पालकमंत्रीपद जळगावच्या गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. यामुळे नाराज झालेल्या एकनाथ शिंदे यांनी थेट सातारा येथील दरे गाव गाठले आहे. शिंदे निराश असले किंवा मोठ्या यशाची आकांक्षा असते, त्यावेळी दरे गावी येतात, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दरे गाव गाठले की राजकीय भूकंपाच्या चर्चा रंगतात. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदे यांची राजकीय महत्वकांक्षा मोठी आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले, त्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे किमान पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळेल, असे एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांना वाटत होते, मात्र भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला भाग पाडले. एकीकडे महायुतीतील तिन्ही पक्षाच्या संगनमताने निर्णय होत असल्याचे तीनही पक्षाचे नेते बाहेर सांगतात, मग 24 तासाच्या आता पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती का देण्यात आली, हा मोठा सवाल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भेट, फडणवीसांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी केलेला गडचिरोली दौरा आणि या गडचिरोली दौऱ्यावऊन शिवसेना नेत्यांनी केलेल्या कौतुकानंतर शिंदे थोडे अस्वस्थ झाले आहेत. या भेटीवर उदय सामंत, गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखविले, मात्र एकनाथ शिंदे यांनी कधी आपली नाराजी व्यक्त केली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना आदिती तटकरे या रायगड जिह्याच्या पालकमंत्री होत्या, त्यावेळी तटकरे शिवसेनेच्या आमदारांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिह्यातील आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी केला होता. शिंदे यांनी त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले, या सरकारला अजित पवारांचे तिसरे इंजिन लागले आणि रायगडचे पालकमंत्रीपद पुन्हा आदिती तटकरे यांच्याकडे आले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात अडीच वर्ष केवळ आदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या. ना भाजप ना शिवसेना कोणीच दुसऱ्या महिला मंत्री शिंदेंच्या सरकारमध्ये नव्हत्या. रायगडमध्ये 7 आमदारांपैकी तीन आमदार शिवसेना तर तीन आमदार भाजपचे आहेत. आदिती तटकरे या एकमेव राष्ट्रवादीच्या आमदार आहेत, तर नाशिकचे छगन भुजबळ हे वरीष्ठ नेते मंत्रीमंडळात नाहीत. त्यात दादा भुसे, माणिकराव कोकाटे असे बडे नेते असतानाही जळगावच्या गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिल्याने महायुतीमधील नाराजी वाढली आहे. 2026 नाशिकला कुंभमेळा होणार असून, कुंभमेळ्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे जिल्हास्तरीय कुंभमेळा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. कुंभमेळ्dयासाठी केंद्र सरकारचा भरघोस निधी येत असल्याने महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही नियुक्त्याने नाराज असलेले शिंदे गावी गेल्याने, आता शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विशेष विमानाने दरे गावाला जाणार आहेत. याठिकाणी जाऊन हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांची समजूत काढणार आहेत. भाजपच्या नेत्यांना शिंदे यांची समजूत काढण्यासाठी कधी ठाणे तर कधी सातारा गाठावे लागत आहे, शिंदे भाजपच्या मनधरणीला प्रतिसाद देणार का आणि ते नेमकं काय पदरात पाडून घेणार, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विरोधकांच्या वक्तव्याने खळबळ
सरकार स्थापनेनंतर आधी मुख्यमंत्री पदावऊन तर नंतर गृहमंत्री पदावऊन नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार असल्याचे सांगत लवकरच राजकारणात नवा उदय होणार असल्याचे वक्तव्य विजय वडेट्टीवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ्याच घडामोडींचे संकेत मिळायला सुरूवात झाली आहे. महायुती सरकारला महायश मिळाल्यानंतरही राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही.
प्रवीण काळे