अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा हाणामारी
हिंडलगा कारागृहात अधिकारीच बेशिस्त
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृह या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. दोन महिन्यांपूर्वी कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महिला अधिकाऱ्यांसह दोघा जणांमध्ये निर्माण झालेला वाद पोलीस स्थानकापर्यंत पोहोचला होता. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी याच कारागृहातील एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. गुरुवार दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना घडली असून, शनिवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कारागृहाच्या प्रशासकीय विभागाच्या कार्यालयात ही घटना घडली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर पुढील तपास करीत आहेत.
कारागृह अधीक्षक विश्वनाथ (वय 42) यांना मारहाण करण्यात आली असून, प्रशासकीय अधिकाऱ्यावर यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कारागृहाच्या हजेरी पुस्तकात गैरहजेरी मांडल्यावरून झालेल्या वादावादीनंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.